लोकसभा निवडणूक: भाजप हायकमांडच्या आग्रहाखातर एकनाथ शिंदे ठाणे सोडणार का? याचीच चर्चा

By अजित मांडके | Published: June 7, 2023 05:40 AM2023-06-07T05:40:03+5:302023-06-07T05:41:02+5:30

तसे झाले तर लोकसभेत भाजप विरुद्ध ठाकरे यांची शिवसेना यांच्यात थेट लढत होईल.

will eknath shinde leave thane lok sabha on the insistence of bjp High command? | लोकसभा निवडणूक: भाजप हायकमांडच्या आग्रहाखातर एकनाथ शिंदे ठाणे सोडणार का? याचीच चर्चा

लोकसभा निवडणूक: भाजप हायकमांडच्या आग्रहाखातर एकनाथ शिंदे ठाणे सोडणार का? याचीच चर्चा

googlenewsNext

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : महाविकास आघाडीत ठाण्याचा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाला सोडण्याचा निर्णय झाल्याने सध्याचे खासदार राजन विचारे हेच पुन्हा रिंगणात उतरतील, हे स्पष्ट आहे, पण पूर्वीचा दाखला देत ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागातील हा मतदारसंघ मिळावा म्हणून भाजपने जोर लावला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याबाबत कोणतीच भूमिका जाहीर केलेली नसल्याने हायकमांडकडूनच त्यांना शब्द टाकण्याची तयारीही भाजपकडून सुरू आहे. 

ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा गड मानला जातो. प्रकाश परांजपे यांच्यापासून राजन विचारेंपर्यंत हा गड शिवसेनेकडे राहिला. त्यापूर्वी या गडावर भाजपचे वर्चस्व होते. रामभाऊ म्हाळगी, राम कापसे यांनी गाजवलेला हा गड शिवसेनेसोबतच्या मैत्रीत भाजपने सोडला, पण गेल्यावर्षीच्या सत्तांतरानंतर शिवसेनेतील फुटीनंतर भाजपने पुन्हा या मतदारसंघावर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. 

भाजपकडून राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे, ठाण्यातील आमदार संजय केळकर आणि संजीव नाईक यांची नावे चर्चेत आहेत. नाईक येथे निवडणूक लढवून विजयी झाले होते. सहस्त्रबुद्धे दीर्घकाळ स्पर्धेत असले, तरी त्यांचा जाहीर वावर कुठे दिसलेला नाही. ठाण्यात असून शिंदे यांच्या शिवसेनेला विरोध करणारे संजय केळकर यांनीही लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही. शिवसेनेच्या शिंदे गटाकडून नरेश म्हस्के वगळता अन्य कोणाचे नाव चर्चेत नाही. 

नवी मुंबईत गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे या दोन आमदारांतील वाद संपुष्टात आणणे, मिरा-भाईंदरमध्ये विद्यमान आमदार गीता जैन भाजपसोबत असल्या, तरी नरेंद्र मेहता आणि त्यांच्यात दिलजमाई घडवून आणणे हे भाजपपुढील आव्हान असेल. सध्या तरी या मतदारसंघातील शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यातील बलाबल समान आहे, पण दोन्ही गटांपुढे अंतर्गत नाराजीचे आव्हान आहे. 

शिवाय युती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय वरून झाला असला, तरी स्थानिक पातळीवर एकत्र येण्यात अनेक आव्हाने आहेत. त्यामुळेच शिवसेना-भाजपने मतदारसंघाबाबतची संदिग्धता कायम ठेवली आहे.

ठाकरे गटाची आर्थिक कोंडी 

ठाणे लोकसभेतील तिन्ही महापालिकांत प्रशासकीय राजवट आहे. सध्या तेथे राज्य सरकारकडून म्हणजेच शिंदे-फडणवीस यांच्या सूचनेनुसारच कामे होत आहेत. तेथील ठाकरे गटाची रसद थांबली आहे. त्यामुळे विचारे यांची दिलदारी आणि उद्वव ठाकरे यांच्याबद्दल सामान्य मतदारांत असलेल्या सहानुभूतीवरच त्या पक्षाची  भिस्त आहे.

मतांचे गणित नेमके कसे असेल?

मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती आणि मोदी लाटेचा फायदा विचारे यांना मिळाला. त्यांना ७ लाख ४० हजार ९६९ मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांना ३ लाख २८ हजार ८२४ मते मिळाली. आता राष्ट्रवादीने माघार घेतल्याने त्याचा फायदा विचारे यांना होऊ शकतो, पण शिवसेनेतील फुटीचा, भाजप सोबत नसल्याचा फटकाही  विचारे यांना बसू शकतो.

‘...तर शिंदे नाही म्हणणार नाहीत’

 ठाणे जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व असलेल्या एकनाथ शिंदेंच्या मनात काय सुरू आहे, याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण त्यांनी अजून निर्णय दिलेला नाही. ठाणे मतदारसंघाच्या बदल्यात त्यांना कोणता मतदारसंघ हवा आहे, हेही स्पष्ट झालेले नाही. भाजपच्या ‘हायकमांड’ने आग्रह केला, तर शिंदे त्याला नाही म्हणणार नाहीत, असा त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे. तसे झाले तर लोकसभेत भाजप विरुद्ध ठाकरे यांची शिवसेना यांच्यात थेट लढत होईल.


 

Web Title: will eknath shinde leave thane lok sabha on the insistence of bjp High command?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.