इंजीन देणार बाळ्यामामांना स्पीड?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 02:01 AM2019-04-12T02:01:53+5:302019-04-12T02:02:15+5:30
मोदींविरोधात लढाई : मनसेचे पदाधिकारी झाले सैरभैर
भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपसह सर्वच पक्षांना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. या बंडखोरांना आवरण्यासाठी पक्षनेत्यांना बैठका घ्याव्या लागणार आहेत. या निवडणुकीत मनसे रिंगणात नसल्यामुळे या पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी सैरभैर झाले आहेत. त्यामुळे मनसेचे इंजीन नक्की कुणाला बळ देते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
या मतदारसंघात भाजपचे उमेदवार कपिल पाटील हे रिंगणात असताना शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून भाजपला आव्हान दिले आहे. त्यामुळे शिवसेनेने त्यांना पक्षातून निलंबित केले. परिणामी, शिवसेनेचा एक गट युतीच्या उमेदवाराविरोधात काम करणार आहे. सुरेश म्हात्रे हे काही काळ मनसेत होते. त्यांनी मनसेच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांच्याशी परिचित असलेला मनसेचा एक गट म्हात्रेंसोबत राहणार असल्याचे दिसत आहे.
याचा भाजपच्या पारंपरिक मतांवर परिणाम होण्याचीही शक्यता असून, अपक्ष बाळ्यामामा म्हात्रे यांना बळ मिळण्याची शक्यता बळावली आहे.
मनसेने लढवलेल्या इतर निवडणुकांचे काय झाले?
२००९ साली भिवंडी लोकसभा निवडणुकीत मनसेचे देवराज के. म्हात्रे यांनी एक लाख नऊ हजार मते मिळवली होती. त्यानंतर, कल्याण विधानसभा क्षेत्रातून प्रकाश भोईर निवडून आले होते. २०१४ साली बाळ्यामामा म्हात्रे यांनी भिवंडी लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना ९३ हजार मते मिळाली होती. या मतदारसंघात मनसेची एक लाखाच्या आसपास मते आहेत. यावेळी मनसे लोकसभा निवडणुकीत नाही. त्यामुळे लाख मतांचे धनी असलेले मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते या निवडणुकीत कोणाला बळ देणार, हे येणारा काळच ठरवणार आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मनसेचे पदाधिकारी स्वत:ची वेगळी चूल मांडून भाजपविरोधात काम करण्याची शक्यता आहे.