‘डाव’ खरे होणार?
By admin | Published: March 26, 2016 02:45 AM2016-03-26T02:45:59+5:302016-03-26T02:45:59+5:30
दोन महिन्यांवर आलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरे यांनी पाचव्यांदा निवडून येण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली असली, तरी स्थानिक स्वराज्य
- अजित मांडके, ठाणे
दोन महिन्यांवर आलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरे यांनी पाचव्यांदा निवडून येण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली असली, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांत वाढलेल्या बळामुळे यंदा त्यांना शिवसेनेचे कडवे आव्हान पेलावे लागणार आहे. त्याचवेळी विविध पक्षांत मैत्रीचे संबंध राखून असलेल्या डावखरे यांना कडवी लढत देण्यासाठी शिवसेनेलाही अनेक अर्थांनी तगडा उमेदवार द्यावा लागणार आहे. पुढच्या वर्षी पालिका निवडणूक असल्याने नाराजीला तोंड फुटणार नाही, याची काळजी घेत शिवसेनेला उमेदवार द्यावा लागणार आहे. सध्या तिघांची नावे पुढे येत असली तरी निवडून येण्याच्या क्षमतेवर उपऱ्याला संधी की निष्ठावंताला अशी चर्चा रंगली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर निवडून देण्याची ठाण्याची जागा आता ठाणे-पालघर अशी विस्तारली आहे. त्यावर आजवर डावखरे यांचे निर्विवाद वर्चस्व असल्याने राष्ट्रवादीकडून स्वाभाविकपणे त्यांचेच नाव निश्चित झाले. काँग्रेसने यापूर्वीच डावखरे यांना पाठींबा दर्शविला आहे. शिवसेनेच्या मदतीसाठी डावखरे यांनी ‘मातोश्री’वर जाऊन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेटही. पण ‘बघू, विचार करु,’ असे उत्तर त्यांना मिळाल्याचे बोलले जाते. शिवसेनेने आपल्या वाढत्या बळाचा विचार करून तगडा उमेदवार दिला, तर मात्र यंदाच्या निवडणुकीत ‘डाव’ खरे होणार का, हाच प्रश्न राजकीय वर्तुळात आहे.
सध्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या महापालिका शिवसेना-भाजपाच्या ताब्यात आहेत. नवी मुंबईतही शिवसेनेची ताकद वाढली आहे. अंबरनाथ, बदलापुर नगरपालिकेवरही शिवसेना-भाजपाचा वरचष्मा आहे. त्यामुळे डावखरेंना दीर्घकाळानंतर पहिल्यांदाच या निवडणुकीत कडवे आव्हान पेलावे लागणार असल्याची चिन्हे आहेत.
१९९२ आणि १९९८ मध्ये डावखरे यांनी कॉंग्रेसच्या तिकीटावर ही निवडणुक लढविली आहे. त्यानंतर २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी आव्हान दिले होते. २०१० मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने रमेश म्हात्रे यांना संधी दिली होती. परंतु ऐन वेळेस शिवसेनेने म्हात्रे यांना माघार घेण्यास भाग पाडल्याने डावखरे बिनविरोध निवडुन आले होते.
शिवसेनेने जरी या निवडणुकीची तयारी केली असली तरी, त्या पक्षात तिघे मातब्बर इच्छुक झाल्याने पक्षाची कोणावर कृपादृष्टी होणार, याकडेही लक्ष लागले आहे. आधीचा त्याग लक्षात घेता शिवसेनेतून ज्येष्ठ नेते अनंत तरे यांचे नाव आघाडीवर आहे. त्या खालोखाल रवींद्र फाटक आणि एच. एस. पाटील यांच्या नावांचीही चर्चा आहे. ज्याची आर्थिक बाजू भक्कम असेल तोच वरचढ ठरतो हे या निवडणुकीत यापूर्वीही स्पष्ट झाले आहे. या तिघांमध्ये फाटक यांची हीच जमेची बाजू आहे. त्यांना २००४ मधील ही निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे. मात्र फाटक यांना विधानसभेला संधी दिली होती, तर एच. एस. पाटील यांना महापौरपद दिल्याने त्यांना पुन्हा संधी दिली जाईल का? याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहे. शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी या जागेसाठी थेट वरिष्ठांकडून मोर्चेबांधणी केली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी ते इच्छुक होते, परंतु त्यांना डावलून फाटक यांना संधी देण्यात आल्याने त्यांनी बंडखोरी करुन थेट एकनाथ शिंदे यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यापूर्वीही डावलण्यात आल्याने आता ही संधी सोडण्याची त्यांची मन:स्थिती नाही.
बविआकडे १०७ नगरसेवकांचा गट
बहुजन विकास आघाडीकडे १०७ नगरसेवकांचा मजबूत गट आहे. सध्या ते राष्ट्रवादीच्या बाजुने असल्याचे चित्र असले तरी यापूर्वीचा इतिहास पाहिल्यास केंद्रात आणि राज्यात ज्या पक्षांची सत्ता आहे त्याच बाजुने त्यांचा कल असतो. त्यामुळे ऐनवेळी शिट्टी कोणाच्या बाजूने वाजणार, हेही निर्णायक ठरेल.
त्या चार मतांचा फटका? : सध्या परमार प्रकरणात जामिनावर बाहेर आलेले हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला, विक्रांत चव्हाण आणि सुधाकर चव्हाण यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी राज्य शासनाकडून हालचाली सुरु आहेत. त्यांचे पद रद्द झाले तर त्याचा फटका राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे.