बदलापूरातील पूरग्रस्त कुटुंबांना भरीव मदत करणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 08:17 PM2019-07-29T20:17:41+5:302019-07-29T20:31:33+5:30

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे भूमिपूजन

will give adequate help to flood hit families assures cm devendra fadnavis | बदलापूरातील पूरग्रस्त कुटुंबांना भरीव मदत करणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

बदलापूरातील पूरग्रस्त कुटुंबांना भरीव मदत करणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Next

बदलापूर : शिवसेना आणि भाजपाची सत्ता म्हणजे रयतेची सत्ता आहे. शिवरायांना अभिप्रेत असलेली कामे करण्याचे काम आमचे सरकार करत आहे. महाराजांच्या तत्वानुसार चालण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे सरकारचे सर्व निर्णय नागरिकांच्या हिताच्या हेतूनचे घेतले जात आहेत. नुकत्याच आलेल्या महापुरात बाधित झालेल्या प्रत्येक कुटुंबाचा संसार उभा करण्यासाठी शासन भरीव मदत करेल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

मुरबाडमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण, नव्या पोलीस स्टेशन आणि पोलीस वसाहतीचे उद्घाटन, मुरबाड बस आगाराचे भूमिपूजन, धान्य साठवणगृहाचे भूमिपूजन आणि म्हसा महाविद्यालयाचे भूमिपूजन असा मोठा सोहळा मुरबाडमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी २७ जुलैच्या महापुरात ठाणे जिल्ह्यासह बदलापूरातील बाधित कुटुंबियांना भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले. 

२००५च्या महापुरात जी मदत करण्यात आली होती, त्यापेक्षा जास्त मदत कशी करता येईल याचा निर्णय शासन घेणार आहे. त्यासाठी स्वतंत्र आदेशदेखील शासन काढेल असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पुराच्या परिस्थितीत नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी शासन स्तरावर आम्ही घेतलेले निर्णय हे योग्य ठरले. पुरात कोणतीही जीवितहानी होणार नाही याची आम्ही काळजी घेतली. आता ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांचा संसार नव्याने कसा सुरु करता येईल यासाठी शासन निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

मुरबाडमधील विकास कामांचे उद्घाटन करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा उर्जा देणारा पुतळा आहे. केवळ पुतळा उभारुन त्याची पूजा करण्याऐवजी त्या छत्रपती महाराजांच्या पुतळ्याकडे पाहून नागरिकांनी छत्रपतींना अभिप्रेत असलेले राज्य निर्माण करण्यासाठी हातभार लावण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोरच पोलीस स्टेशन असल्याने पोलीसदेखील आता त्यातुन उर्जा घेतील आणि महाराजांच्या स्वराज्यात जसे पोलीस वागत होते, तसे मुरबाडचेही पोलीस वागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

मुरबाड मतदारसंघात काम करताना या ठिकाणी नागरिकांना काय हवे आहे याची कल्पना आमदार कथोरे यांना असल्याने ते शासनाकडे पाठपुरावा करताना तशा पद्धतीनेच मागणी करतात. त्यामुळे त्यांची मागणी नाकारण्याची धमक शासनात नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुरबाड मतदारसंघात कामे झाली आहेत. एमएमआरडीए क्षेत्रात मुरबाडचाही समावेश केल्याने आता मुरबाडला दुहेरी मदत होणार आहे. पूर्वीचे सरकार एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात केवळ ५०० ते ६०० कोटींची कामे करित होते. मात्र आमच्या सरकारच्या काळात एकाच विधानसभेत ५०० कोटींपेक्षा जास्तीची कामे होतात. खऱ्या अर्थाने एमएमआरडीएचा लाभ ठाणे जिल्ह्याला झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

या कार्यक्रमाला पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, नरेंद्र पवार, निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, नगराध्यक्षा शितल तोंडलीकर  आदी मान्यवर उपस्थित होते. 
 

Web Title: will give adequate help to flood hit families assures cm devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.