गोळवलकर चुकल्याची माफी मागणार का?, डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा भाजपला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 07:26 AM2023-01-03T07:26:04+5:302023-01-03T07:27:30+5:30
शिवपुत्र संभाजीराजे यांच्याबाबत याआधी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना भाजपचे नेते आपले आदर्श मानत आहेत, असे आव्हाड म्हणाले.
ठाणे : अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानासाठी माफी मागावी, अशी मागणी करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी संभाजी महाराजांबद्दल, सावरकर आणि गोळवलकर यांनी केलेल्या विधानाबद्दल माफी मागावी, अशी मागणी आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली. शिवपुत्र संभाजीराजे यांच्याबाबत याआधी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना भाजपचे नेते आपले आदर्श मानत आहेत, असे आव्हाड म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म ही संकल्पना महाराष्ट्र धर्म, मराठा धर्म आणि स्वराज्य अशा अर्थाने निर्मिली होती. ‘मराठा’ ही व्यापक संकल्पना होती अन् त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व समाविष्ट झाले होते. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या राज्याला रयतेचे राज्य असे म्हटले गेले होते. या रयतेच्या राज्याचे वारसदार छत्रपती संभाजीराजे हे होते. त्यामुळे ते कुठल्या एका धर्माच्या रक्षणासाठी बाहेर पडले असे कोणतेही ऐतिहासिक संदर्भ नाहीत, असे आव्हाड म्हणाले.
सावरकर यांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकामध्ये शिवरायांच्या राज्याबद्दल काय म्हटले आहे हे सांगून मला नवीन वाद निर्माण करायचा नाही; पण सावरकरांनी या पुस्तकात संभाजी महाराजांंना आक्षेपार्ह सवयी असल्याचे लिहिले आहे. तसेच, शिवाजी महाराजांचा नाकर्ता पुत्र असेही सावरकरांनी संभाजीराजेंबद्दल लिहिले आहे.
दुसरे पुस्तक गोळवलकर यांचे ‘बंच ऑफ थॉटस्’ असून, त्यामध्ये गोळवलकर म्हणतात की, ‘संभाजी महाराज हे आक्षेपार्ह गोष्टींच्या आहारी गेले होते. ‘राजसंन्यास’ आणि ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकांमध्ये संभाजी महाराजांचे पात्र कसे रंगविले आहे याबद्दल कोणी बोलले नाही. आम्ही वारंवार त्यावर बोलत आलो आहोत. आम्ही छत्रपती संभाजीराजांना स्वराज्यरक्षक असेच संबोधत आलो आहोत, असेही ते म्हणाले.