ठाणे होईल तेव्हा होईल, पण आधी उद्याने तर होऊ द्या स्मार्ट...
By admin | Published: April 17, 2017 04:54 AM2017-04-17T04:54:10+5:302017-04-17T04:54:10+5:30
हुश्श... परीक्षा संपली एकदाची. आता फक्त मनसोक्त खेळायचे. एप्रिल- मे महिन्यांतील सुटी म्हणजे मुलांसाठी धम्माल आणि मस्ती. अभ्यासाच्या
प्रज्ञा म्हात्रे, ठाणे
हुश्श... परीक्षा संपली एकदाची. आता फक्त मनसोक्त खेळायचे. एप्रिल- मे महिन्यांतील सुटी म्हणजे मुलांसाठी धम्माल आणि मस्ती. अभ्यासाच्या कटकटीतून बाहेर पडलेल्या मुलांचा सकाळसंध्याकाळ खेळण्याकडे ओढा असतो. पूर्वी मुलांचा मैदानी खेळांकडे कल होता. आता मैदाने कमी होत असल्याने मुलांना खेळण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे ही मुले मोबाइलवर गेम खेळण्यातच दंग असतात.
शहरातील मैदानांबरोबरच उद्यानांचीही दुरवस्था झाली आहे. मुलांच्या मनोरंजनासाठी उभारलेल्या उद्यानांची अवस्था पाहून आता ती देखील लयास जातील का, अशी भीती निर्माण झाली आहे. उद्यानांच्या दुरवस्थेमुळे मुलांनी खेळायचे कुठे, असा प्रश्न समस्त पालकांनी उपस्थित केला आहे. इमारतीत खेळायला जागा शिल्लक राहिलेल्या नाहीत. ज्या ठिकाणी जागा तेथे मुलांच्या खेळण्याचा त्रास होतो, हे कारण पुढे करून रहिवासी विरोध करतात. पालिका उद्याने बांधते. पण, कालांतराने त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करते, असा आरोप ठाण्यातील सुज्ञ नागरिकांनी केला आहे. उद्यानांचे नूतनीकरण केले जाईल, असे उद्यान विभागाकडून सांगितले जाते. मात्र, दरवर्षी वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात. पालिकेच्या उदासीन कारभारामुळे आज मुलांसाठी असलेली उद्याने ही केवळ नावाला राहिली आहेत. ठाणे महापालिका आयुक्त ठाणे शहराला स्मार्ट सिटी करण्याकडे नेत असले, तरी दुसरीकडे या आयुक्तांनी उद्यानांकडेही लक्ष द्यावे, अशी माफक अपेक्षा समस्त ठाणेकरांकडून व्यक्त होत आहे.
मोठ्या गोष्टी करण्यापेक्षा आधी शहरात असलेल्या करमणुकीच्या, मनोरंजनाच्या गोष्टींकडे पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे. लुप्त होण्याच्या मार्गावर असणाऱ्या या उद्यानांना नवी संजीवनी मिळेल का, असा सवाल आता ठाणेकर विचारत आहेत. या समस्यांकडे पालिका कितपत लक्ष देईल, हाही एक यक्षप्रश्न आहेच. आज ठाणे शहरातील उद्यानांची अवस्था पाहिल्यास मुलांना तेथे खेळण्यासाठी का पाठवावे, असा प्रश्न पालकांना पडला आहे. तुटलेली खेळणी, अस्वच्छता, मद्यपी, गर्दुल्ल्यांचा वावर असे चित्र बहुतांश उद्यानांमधील आहे. अशा परिस्थितीत आमची मुले खासकरून मुली सुरक्षित राहतील का, असा सवाल महिलांनी विचारला आहे. पालिका जर आमच्याकडून कर आकारते, तर उद्यानांना अवकळा का आली आहे. मग हे पैसे जातात कुठे? सुरक्षारक्षक नसल्याने या उद्यानांमधून सर्रास अनैतिक व्यवसाय सुरू असतात. आश्चर्य म्हणजे याकडे पालिका प्रशासन आणि नगरसेवकांचे लक्षही जात नाही.
मुले, ज्येष्ठ नागरिक हे उद्यानांमध्ये विरंगुळा, स्वच्छ हवा मिळावी, यासाठी येतात. पण, त्यातील काहीच मिळत नाही. नागरिकांना बसण्यासाठी असलेली बाके मोडकळीस आली आहेत. खेळण्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. झाडे सुकलेली आहेत. मग, अशा परिस्थितीत नागरिकांना फ्रेश कसे वाटणार, हा खरा प्रश्न आहे. निवडणुका जवळ आल्या की, मतांसाठी पुळका येतो. निवडणुका झाल्या की, नेते आश्वासने विसरून जातात. ती उद्यानांमधील धुळीसोबत हवेत विरून जातात.