केडीएमसी हद्दीतील हॉटेलच्या वेळा वाढणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 12:26 AM2020-10-09T00:26:10+5:302020-10-09T00:26:13+5:30
आयुक्त कळवणार निर्णय : हॉटेलमालकांनी घेतली भेट, व्यावसायिकांनी मांडल्या समस्या
डोंबिवली : उल्हासनगरच्या धर्तीवर केडीएमसी हद्दीतील हॉटेल, बार, रेस्टॉरंट मध्यरात्रीपर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी द्यावी, या मागणीसाठी कल्याण, डोंबिवली येथील हॉटेल ओनर्स असो.च्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. त्यावर आयुक्त सकारात्मक असून, निर्णय कळवणार असल्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
कल्याणमधील असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण शेट्टी व डोंबिवलीतील अजित शेट्टी यांनी हॉटेलचालकांच्या समस्या मांडल्या. सात महिन्यांपासून हॉटेल व्यवसायाला फटका बसला आहे. सध्या अवस्था बिकट असून अनेकांनी व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील अनेक हॉटेल, बार हे सकाळी एकच शिफ्टमध्ये सुरू आहेत. दुपारी ४ वाजता अनेक जण बंद करतात. यातून त्यांना काहीच लाभ होत नाही. केवळ नावाला व्यवसाय सुरू आहे. सोमवारपासून हॉटेल सुरू असले, तरीही फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी बहुतांश हॉटेलात केवळ ३३ टक्के आसनव्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने हॉटेल सुरू नसल्याचे ते म्हणाले.
वीजबिल, करामुळे मोडले कंबरडे
वीजबिल, कर आणि कामगारांचे पगार, यामुळे हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. अशा अनेक अडचणी या व्यावसायिकांसमोर असल्याचे शेट्टी यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.
दरम्यान, आयुक्तांनी सगळ्या समस्या ऐकून घेत वेळ वाढवून देण्यासंदर्भात काही बदल करता येतो का? याचा विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे शेट्टी म्हणाले.