उपोषणाने उल्हासनगर पालिकेतील भोंगळ कारभार थांबणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:37 AM2021-08-01T04:37:07+5:302021-08-01T04:37:07+5:30

सदानंद नाईक लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : डॉ. राजा दयानिधी महापालिकेचे निष्क्रिय आयुक्त असल्याचा आरोप करून उपमहापौर भगवान भालेराव ...

Will the hunger strike stop the mismanagement in Ulhasnagar Municipality? | उपोषणाने उल्हासनगर पालिकेतील भोंगळ कारभार थांबणार?

उपोषणाने उल्हासनगर पालिकेतील भोंगळ कारभार थांबणार?

Next

सदानंद नाईक

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : डॉ. राजा दयानिधी महापालिकेचे निष्क्रिय आयुक्त असल्याचा आरोप करून उपमहापौर भगवान भालेराव यांनी उपोषण केले. मात्र, उपोषणानंतर आयुक्तांचा स्वभाव बदलणार का व महापालिकेचा भोंगळ कारभार थांबणार का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत असून, पालिका आयुक्तांच्या कारभारावर टीका होत आहे.

उल्हासनगरात गेल्या वर्षी कोरोना रुग्णांची संख्या वाढली. त्यादरम्यान डॉ. राजा दयानिधी यांची महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली. दयानिधी स्वतः डॉक्टर असल्याने त्यांनी कोरोनाकाळात चांगले काम करून शहरवासीयांची सुरुवातीला वाहवाह मिळविली. मात्र, त्यानंतर नगरसेवक, नागरिक, पत्रकार यांच्यासह पालिका अधिकारी यांना आयुक्त भेटत नसल्याचा आरोप होऊन त्यांच्याबाबत शहरात रोष निर्माण झाला. पत्रकारांनीही आयुक्त भेटत नसल्याचे सांगून त्यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला होता. एकूणच आयुक्त दयानिधी भेटत नसल्याने त्यांच्याबाबत शहरात असंतोष निर्माण झाला. अखेर उपमहापौर भगवान भालेराव यांच्या उपोषणाने आयुक्तांविरोधीचा राग बाहेर पडला.

शहरात अनधिकृत व धोकादायक इमारतीचा प्रश्न उभा ठाकला असताना दुसरीकडे शेकडो विनापरवाना बहुमजली अवैध बांधकामे आरक्षित जागा, खुल्या जागेवर उभी राहत आहेत. अशा बांधकामांवर गेल्या दीड वर्षात महापालिकेने पाडकाम कारवाई केली नाही. मग अशा भूमाफियांना अभय कोणाचे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. महापालिकेच्या अनेक विभागांचे आर्थिक बजेट दोन महिन्यांत संपल्याची टीका होत आहे.

------------------

महापालिकेच्या भोंगळ कारभारावर टीका

महापालिका कोविड रुग्णालयासाठी साहित्य खरेदीचा प्रस्ताव स्थायी समिती सभेत प्रशासनाच्या वतीने मंजुरीसाठी आला. साहित्यामधील प्रत्येक वस्तूची किंमत बाजारभावापेक्षा दामदुप्पट असल्याने सर्व स्तरातून टीका झाली. एका उशीची किंमत ९००, लोखंडी बेडची किंमत १९ हजार ५००, तर एका फ्रीजची किंमत साडेतीन लाख दाखविण्यात आली. इतर वस्तूंच्या किमतीही अशाच दुप्पट असल्याची टीका उपमहापौरांनी केली. यामुळे महापालिकेचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.

Web Title: Will the hunger strike stop the mismanagement in Ulhasnagar Municipality?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.