मला काय मेल्यावर घर मिळणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:36 AM2018-02-22T00:36:45+5:302018-02-22T00:36:48+5:30
कल्याण-डोंबिवलीच्या रस्ते विकासकामात बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे उंबर्डे येथे पुनर्वसन करण्याचे महापालिकेने लिहून दिल्यानंतरही गेली १४ वर्षे घर मिळत अनेकांच्या पदरी वनवास आला आहे.
कल्याण : कल्याण-डोंबिवलीच्या रस्ते विकासकामात बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे उंबर्डे येथे पुनर्वसन करण्याचे महापालिकेने लिहून दिल्यानंतरही गेली १४ वर्षे घर मिळत अनेकांच्या पदरी वनवास आला आहे. प्रकल्पबाधित असलेल्या शालूबाई खांडे या वृद्ध महिला २००४ सालापासून घरासाठी पालिकेकडे पाठपुरावा करीत आहेत. त्यांनी मंगळवारी पुन्हा महापालिका मुख्यालयात घरासाठी खेटे घातले, पण महासभेत व्यस्त असलेल्या प्रशासनाला त्यांच्याकडे पाहण्यास वेळ मिळाला नाही. त्यामुळे मला काय मेल्यावर घर मिळणार आहे का, असा जळजळीत सवाल त्यांनी केला.
शालूबाई यांचे वय ६० वर्षाचे आहे. त्या इंदिरानगरात राहत होत्या. रस्ते विकासकामात त्याचे घर बाधित झाले. त्यांचे पुनर्वसन उंबर्डे येथील सेक्टर ‘ई’ मधील प्लॉट क्रमांक ३८ मध्ये करण्यात आल्याचे महापालिकेने त्यांना लेखी कळविले होते. वाटप करण्यात आलेल्या भूखंडात महापालिकेच्या प्रशासनाने बदल केला. त्यानंतर पुन्हा नऊ जणांची यादी नव्याने वाटप करण्यात आलेल्या भूखंडासह देण्यात आली. त्या यादीत शालूबाई यांना उंबर्डे येथेच सेक्टर ‘ए’ मधील प्लॉट क्रमांक चार दिल्याचे सांगण्यात आले. नव्याने वाटप करण्यात आलेल्या यादीवरही शहर अभियंत्याची स्वाक्षरी होती. ही यादी २००४ साली शालूबाईसह अन्य प्रकल्पबाधितांना देण्यात आली. पण अजूनही त्यांचे पुनवर्सन झाले नाही. त्यांना त्यांच्या वाट्याचे घर अद्याप मिळालेले नाही.
महासभेनिमित्ताने पुन्हा त्या मंगळवारी महापालिका मुख्यालयात आल्या. पण महासभेत व्यस्त असल्याने त्यांनी अधिकारी भेटले नाहीत. मुख्यालयाच्या आवारात एका कट्टयावर बसून त्या घराची याचना करीत होत्या. २००४ सालापासून त्या पाठपुरावा करीत आहेत. तरी त्यांना अद्याप घर मिळालेले नाही. आता घर मिळणार नसेल तर मी मेल्यावर पालिका मला घर देणार आहे का, असा संतप्त सवाल शालूबाई यांनी उपस्थित केला. त्यांची हाक ऐकून शिवसेना नगरसेवक सुनिल वायले यांनी त्यांना सोबत घेत मालमत्ता विभागाच्या अधिकाºयांचे दालन गाठले. तसेच शालूबार्इंची कागदपत्रे सादर केली. चार दिवसात हे प्रकरण मार्गी लावू, असे आश्वासन घेऊन शालूबाई रिकाम्या हातीच निराश होऊन घरी परतल्या...