पोलिसांसाठीच्या योजनांची आर्थिक तरतूद वाढवणार
By admin | Published: January 14, 2016 12:38 AM2016-01-14T00:38:59+5:302016-01-14T00:38:59+5:30
राज्य शासनाकडून पोलिसांना मिळणारा निधी अपुरा पडतो. त्यामुळे पोलिसांसाठीच्या विविध योजना राबविण्यासाठी आर्थिक तरतुदींमध्ये वाढ करण्याचा मानस ठाण्याचे मावळते सहपोलीस
ठाणे : राज्य शासनाकडून पोलिसांना मिळणारा निधी अपुरा पडतो. त्यामुळे पोलिसांसाठीच्या विविध योजना राबविण्यासाठी आर्थिक तरतुदींमध्ये वाढ करण्याचा मानस ठाण्याचे मावळते सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी व्यक्त केला. अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून मुंबईत प्रशासन विभागाची जबाबदारी लक्ष्मीनारायण यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पदभार सोडण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.
‘पोलिसांची वाहने, शस्त्रे, निवासस्थाने तसेच इतर सर्व सामग्रीच्या खरेदीसाठी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातील तरतूद वाढविल्यास अनेक गोष्टी शक्य होणार आहेत, याशिवाय, राज्यभरातील पोलिसांना मुंबईत औषधोपचार घ्यायचे झाल्यास तांत्रिक अडचणी येत आहेत. त्या दूर करण्याचा प्रयत्न होईल, असे ते म्हणाले. पोलिसांच्या बदल्या तसेच बढत्या आणि त्यांच्या कारभारात पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला जाईल,’ असे त्यांनी सांगितले.
ठाण्यातील आपल्या कारकिर्दीबद्दल ते म्हणाले, ‘ठाणेकरांनी कोणत्याही चांगल्या निर्णयाला उत्स्फूर्तपणे साथ दिली. डान्स बार किंवा खासगी बसेसवरील कारवाईच्या वेळी हा अनुभव आला. तपासामध्ये अधिकाऱ्याला वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळावे, म्हणून वापरलेल्या ‘सतर्क’ या सॉफ्टवेअरचा फायदा झाला. आता हीच यंत्रणा राज्यभर राबविण्यासाठी महासंचालक पातळीवर विचार सुरू आहे. सोनसाखळी चोरी तसेच महिलांच्या संदर्भातील गुन्ह्णांवर बऱ्यापैकी अंकुश मिळविला. त्यासाठी वेगळी पेट्रोलिंग योजना राबविली. आंबिवलीच्या इराणी वस्तीवर कोम्बिंग आॅपरेशन आणि प्रबोधनही केले.’
कामाचा आढावा घेताना ते म्हणाले, ‘वर्तकनगर येथील पोलीस वसाहतीचा म्हाडाकडून पुनर्विकास केला जाणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी अल्प दरात घरेही उपलब्ध व्हावीत, यासाठी प्रयत्न केला.’ (प्रतिनिधी)
नियंत्रण कक्षात लखनौ पॅटर्न
ठाण्यातील नियंत्रण कक्षात लखनौच्या धर्तीवर मोबाइल डाटा ट्रान्समीटर बसविले आहेत. त्यामुळे रस्त्यावरचा राडा थेट नियंत्रण कक्षात दिसणार आहे. ५० लाखांच्या खर्चातून नियंत्रण कक्षात कमांड सेंटर सुरू होणार आहे. याशिवाय, ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या नियंत्रण कक्षाचाही कायापालट करून आधुनिक सुविधांसह सीसीटीव्हींनी जोडला आहे. आधुनिकीकरणावर जोर देत लोकाभिमुख पोलिसिंगवर भर दिला, याकडे त्यांनी लक्ष वेधले.