औरंगजेबाच्या कबरीचे महिमा मंडन कधीही होऊ देणार नाही - देवेंद्र फडणवीस
By नितीन पंडित | Updated: March 17, 2025 13:31 IST2025-03-17T13:30:51+5:302025-03-17T13:31:41+5:30
देवेंद्र फडणवीस सोमवारी भिवंडीतील मराडे पाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर लोकार्पण प्रसंगी बोलत होते.

औरंगजेबाच्या कबरीचे महिमा मंडन कधीही होऊ देणार नाही - देवेंद्र फडणवीस
भिवंडी - या देशात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा महिमा मंडन होईल, औरंगजेबाच्या कबरीचा महिमा मंडन होऊ देणार नाही. जो कोणी करण्याचा प्रयत्न करेल त्याला चिरडून टाकू असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. सोमवारी ते भिवंडीतील मराडे पाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर लोकार्पण प्रसंगी बोलत होते. या प्रसंगी खा. सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा,माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील,आ. किसन कथोरे,आ. महेश चौघुले,दौलत दरोडा,निरंजन डावखरे,कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील,बालयोगी सदानंद महाराज ,श्रीराम मंदिर न्यास समितीचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज , कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
५० वर्षांपूर्वी औरंगजेबाच्या कबरीस संरक्षित स्थळ घोषित केल्याने त्याच्या रक्षणाची जबाबदारी राज्य शासनाची आहे हे आमचे दुर्दैव आहे. ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारले त्याच्याच कबरीचे संरक्षण आम्हाला करावा लागत आहे.पण काहीही झाले तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचे महिमा मंडन होऊ देणार नाही.छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्यदिव्य मंदिर हे सर्वांना प्रेरणा देणारे आहे. त्यासाठी या स्थळाला राज्य शासनाकडून पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करू अशी घोषणा यावेळी फडणवीस यांनी केली. त्याचबरोबर केंद्राकडून १२ किल्ले जागतिक वारसा यादीत यावे अशी मागणी युनोस्कोकडे करण्यात आली असून संगमेश्वरच्या वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असुन वढु, तुळापूर ,आग्रा,पाणीपत येथे प्रेरणा स्थळ होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
या मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात यावे व भिवंडी वाडा महामार्गाचे रखडलेले काम मार्गी लावावे अशी मागणी खा.सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली असता मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तत्काळ सुचना देत या ठिकाणी सुसज्य रस्त्याचे जाळे निर्माण करण्याच्या सूचना दिल्या असून भिवंडी वाडा रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागेल असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.