विकासकामांत हलगर्जी खपवून घेणार नाही, गुणवत्तापूर्वक कामे झाली पाहिजेत : मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 12:13 PM2023-03-05T12:13:41+5:302023-03-05T12:14:27+5:30
अधिकाऱ्यांना इशारा; जनतेच्या पैशांचा योग्य विनियोगाच्या सूचना
ठाणे : राज्य शासनाकडून विविध विकासकामांसाठी मोठा निधी आलेला आहे. त्या निधीचा योग्य विनियोग करा. हा जनतेचा पैसा आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्वक कामे झाली पाहिजेत. विकासकामांमध्ये कुचराई किंवा हलगर्जी केली तर अजिबात खपवून घेणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी अधिकाऱ्यांना दिला.
ठाण्यातील विविध ठिकाणच्या प्रकल्पांचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बाेलत हाेते. शिंदे म्हणाले की, मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. या ठिकाणच्या रस्त्यांचा कायापालट केला जात आहे. पुढील अडीच वर्षांत मुंबई खड्डेमुक्त होणार आहे. तसेच ठाण्यातील रस्तेदेखील खड्डेमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. ठाण्यात तलाव सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. जोगीला तलावाचे पुनरुज्जीवन केले जात आहे. तलावांचे शहर ही ठाणे शहराची ओळख पुसू द्यायची नाही. चांगले रस्ते, झोपडपट्टी भागातील स्वच्छ सार्वजनिक शौचालये, याकडे प्राधान्याने लक्ष द्या. दरम्यान, रस्ते पावसाळ्यापूर्वी तयार झाले पाहिजे. काँक्रीटीकरणाची कामे वेळेत करा. शहराचा एंट्री पॉइंट ही शहराची ओळख असते. ठाण्याचा एंट्री पॉइंट ही शहराची ओळख कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
तुमच्या ठाण्याचा मुख्यमंत्री
नवीन ठाणे स्टेशनचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकार मदत करीत आहे. तुमच्या ठाण्याचा मुख्यमंत्री झाला आहे. त्यामुळे कोणीही तुम्हाला विकासापासून वंचित ठेवणार नाही, असेही त्यांनी सांगितले. ठाण्याला आंतराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविण्याचे काम तुमचे-आमचे आहे. त्यामुळे नागरिकांनीदेखील जबाबदारीने वागावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
क्लस्टरला लवकरच सुरुवात
क्लस्टरचा विकास लवकरच केला जाईल. यासाठी सिडकोला सोबत घेतले आहे. अडचणी दूर केल्या आहेत. त्यामुळे तातडीने या कामाला प्राधान्य देऊन सुरुवात करा, असे शिंदे यांनी सांगितले. संक्रमण शिबिरात राहावे लागेल, अशी नागरिकांना भीती वाटत आहे. मात्र, त्यांना संक्रमण शिबिरात न पाठवता थेट हक्काच्या घरांच्या चाव्या दिल्या जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉक्टरांचे काम चांगले
ठाणेकरांची वाहतूककोंडीतून सुटका करण्याकरिता शहराच्या बाहेरून वाहतूक नेण्याचे नियोजन आहे. कळवा रुग्णालयातील डॉक्टर चांगले काम करीत आहेत. परंतु, त्यांच्या हॉस्टेलमध्ये सुविधा नाहीत. त्यामुळे जे सुविधा देत नसतील, त्यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. लागलीच कळवा रुग्णालयाच्या मुख्य अधिष्ठातांवर कारवाई झाली.