विनामास्क फिरणाऱ्यांची करणार अँटिजेन चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:40 AM2021-04-06T04:40:03+5:302021-04-06T04:40:03+5:30

कल्याण : कोरोना रुग्ण वाढत असल्याने कल्याण-डोंबिवली मनपाने कडक निर्बंध लादले आहेत. या पार्श्वभूमीवर विनामास्क फिरणाऱ्यांची अँटिजेन चाचणी केली ...

Will perform antigen testing on unmasked walkers | विनामास्क फिरणाऱ्यांची करणार अँटिजेन चाचणी

विनामास्क फिरणाऱ्यांची करणार अँटिजेन चाचणी

googlenewsNext

कल्याण : कोरोना रुग्ण वाढत असल्याने कल्याण-डोंबिवली मनपाने कडक निर्बंध लादले आहेत. या पार्श्वभूमीवर विनामास्क फिरणाऱ्यांची अँटिजेन चाचणी केली जाणार आहे. त्यात ते पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांची रुग्णालयात रवानगी केली जाईल. तसेच मंगल कार्यालये आणि भाजी मंडई यांच्यावर करडी नजर असणार आहे. नियमांचे उल्लंघन करणारी मंगल कार्यालये ३० एप्रिलपर्यंत सील केली जाणार आहेत.

राज्य सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधांची अंमलबजावणी सोमवार रात्री ८ पासून सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बैठक घेतली. त्यात अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, उपायुक्त विवेक पानसरे, साहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार, मनपा अधिकारी उपस्थित होते.

सूर्यवंशी म्हणाले की, लग्नकार्यास ५० जणांना उपस्थित राहता येईल. मात्र, अनेक मंगल कार्यालयांत नियमांचे उल्लंघन होत आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल करून कारवाईही केली जात आहे. यापुढे मंगल कार्यालयांत नियमांचे उल्लंघन झाल्यास ही कार्यालये ३० एप्रिलपर्यंत सील केली जातील. मनपा हद्दीतील मंगल कार्यालयांची यादी पोलिसांना दिली आहे. लग्न कार्यालये आयोजित करणाऱ्यांकडून नियमांचे उल्लंघन होणार नाही, याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार आहे. मनपा हद्दीत अत्यावश्यक सेवा-सुविधांना सवलत दिली आहे. मात्र, भाजी मंडईत नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे भाजी मंडईवर नव्या निर्बंधांनुसार नजर ठेवली जाणार आहे.

मनपाकडून विनामास्क फिरणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाते. आता त्यांच्याकडून दंड घेण्याबरोबर त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांची अँटिजेन चाचणी केली जाणार आहे. चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांची रवानगी रुग्णालयात केली जाईल, अशी माहिती पोवार यांनी दिली. त्यासाठी डाेंबिवलीत रामनगर पोलीस ठाणे आणि कल्याणमध्ये जुने महात्मा फुले पाेलीस ठाण्यात चाचणीची सुविधा केली आहे.

दरम्यान, अत्यावश्यक वस्तूच्या दुकानदारांनी वर्तुळ आखून ग्राहकांमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवून सेवा द्यावी. अन्यथा त्यांच्या विरोधातही कडक कारवाईचा इशारा मनपाने दिला आहे.

- मागच्या वर्षी कोरोनाकाळात डोंबिवलीत एका लग्नामुळे कोरोनाचे रुग्ण वाढले होते. आताही हळदी आणि लग्न सभारंभ सुरूच आहेत.

- अत्यावश्यक सेवेत भाजीपाला विक्रेत्यांना मुभा दिली असली तरी त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन होत आहे.

- कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती रविवारी बंद ठेवण्यात येते. तसेच अन्य दिवशी ५० टक्के क्षमतेने चालविली जाते.

--------------

Web Title: Will perform antigen testing on unmasked walkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.