भिवंडीच्या सत्तेसाठी मागचाच खेळ रंगणार पुन्हा?

By admin | Published: May 26, 2017 12:34 AM2017-05-26T00:34:37+5:302017-05-26T00:34:37+5:30

भिवंडी महापालिकेच्या सत्तेसाठी मतदारांनी नेमका कोणता कौल दिला आहे, ते शुक्रवारी समजणार असले; तरी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही

Will play again for the power of Bhiwandi again? | भिवंडीच्या सत्तेसाठी मागचाच खेळ रंगणार पुन्हा?

भिवंडीच्या सत्तेसाठी मागचाच खेळ रंगणार पुन्हा?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या सत्तेसाठी मतदारांनी नेमका कोणता कौल दिला आहे, ते शुक्रवारी समजणार असले; तरी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही, असा राजकीय पक्षनेत्यांचाच अंदाज आहे. यावेळची महापालिकाही त्रिशंकू असल्याने मागील सत्ताकाळात कोणताही पक्ष कोणाही सोबत जाऊन सत्तेत सहभागी होण्याचा ‘भिवंडी पॅटर्न’ यावेळीही प्रत्यक्षात येईल, असा दावा केला जात आहे.
मागील निवडणुकीनंतरच्या पहिल्या अडीच वर्षात कोणार्क विकास आघाडीसोबत शिवसेना, भाजपा, समाजवादी पक्ष सत्तेत सहभागी होते. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला होता आणि काँग्रेस पक्ष विरोधात होता; तर नंतरच्या अडीच वर्षांत शिवसेनेसोबत काँग्रेस, कोणार्क आघाडी सत्तेत सहभागी झाली. त्यांना समाजवादी पक्षाने बाहेरून पाठिंबा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात बसली होता. त्यामुळे कोणाला किती जागा मिळाल्या आहेत, या गणितापेक्षा कोणताही पक्ष सत्तेसाठी कोणाहीसोबत जाऊ शकतो, हाच अनुभव भिवंडीतील नागरिकांना मिळाला. सर्वच पक्षांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आळीपाळीने सत्ता उपभोगली. त्यामुळे वैचारिक बांधिलकी, समविचारी पक्ष, धर्मनिरपेक्ष आघाडी यापेक्षा सत्ता या एकाच मुद्द्याभोवती पाच वर्षातील राजकारण फिरले.
आताही निवडणुकीत भाजपाने कोणार्क आघाडीशी समझोता केला आहे. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे. काँग्रेस, शिवसेना, एमआयएम, मनसे, बसपा स्बवळावर लढत आहेत. काँग्रेसमधून फुटलेल्या भिवंडी डेव्हलपमेंट पक्षाला मिळतील तेवढ्या जागांची आस आहे. रिपब्लिकन पक्षांचे विविध गट राजकीय भवितव्य आजमावून पाहात आहेत. गेल्यावेळी दोन वॉर्डांचा एक प्रभाग होता, तर यावेळी चार वॉर्डांचा एक प्रभाग आहे. त्यामुळे घराघरात, नात्यांतच तिकिटे वाटली गेली आहेत. अशा स्थितीत ठाणे, उल्हासनगरला उमेदवारापेक्षा पक्ष पाहून मते दिली गेली होती, पण भिवंडीत उमेदवार पाहून मते मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यातही अपक्षांना अधिक जागा मिळतील असाही तर्क मांडला जात आहे.


कसे आहे राजकारण?
भाजपाला महापौरपद हवे आहे, पण भाजपाच्या झेंड्याखालील सत्तेसाठी फक्त कोणार्क आघाडी उत्सुक आहे. या सत्तेत काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी आणि शिवसेना सहभागी होण्याची शक्यता सध्या तरी नाही. त्यामुळे पुन्हा आपल्या नेतृत्त्वाखाली सत्ता स्थापन करण्याचे डोहाळे कोणार्क विकास आघाडीला लागले आहेत. काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला, तर त्यांना आपल्या नेतृत्त्वाखालील सत्तेत राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाला सहभागी करून घेण्यात कोणतीही अडचण नाही. उलट मागील वेळेप्रमाणे शिवसेनाही आमच्यासोबत येईल, असा त्यांच्या नेत्यांचा दावा आहे. शिवसेनेलाही महापौरपद हवे आहे. त्यासाठी त्यांना कोणत्याच पक्षाचे वावडे नाही. तशी सत्तेची गोळाबेरीज त्यांनी मागील सत्ताकाळात करून पाहिली आहे. उल्हासनगरला संधी असूनही शिवसेना आणि भाजपा एकत्र आले नाहीत. त्यामुळे आताही ते पक्ष निवडणुकीनंतर एकत्र येतील, असे स्थानिक नेत्यांनाच वाटत नाही.भाजपात खासदार कपिल पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांना पक्षाने मुक्तहस्त दिला होता. खुद्द मुख्यमंत्री तीन वेळा भिवंडीत येऊन गेले. पण कपिल पाटील यांना भाजपा, संघाचा आतून विरोध आहे. शिवाय राष्ट्रवादीतून त्यांच्यासोबत आलेले कार्यकर्तेच पक्षात वरचढ झाल्याची खदखद कायम आहे. त्यातही त्यांना आपल्या पुतण्याला महापौर करण्यासाठी सत्ता हवी आहे, हे लपून राहिलेले नाही. काँग्रेस पक्षाने मागील निवडणुकीइतकी किंवा त्यापेक्षा थोडी चांगली कामगिरी जरी केली, तरी त्या पक्षाला उभारी मिळण्यासाठी हा निकाल उपयोगी पडेल. समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस यांना काँग्रेससोबतच आघाडी करायची होती. पण काँग्रेसला मागील वेळेपेक्षा विजयाची अधिक खात्री असल्याने त्यांनी जागावाटपात मोठा हिस्सा मागितला. त्यावरून ही आघाडी फिसकटली. पण हे दोन पक्ष एकत्र आल्याने त्यांची ताकद किती वाढली तेही प्रत्यक्ष दिसून येईल. कोणार्क आघाडीला या निवडणुकीत मागील वेळेपेक्षा चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. त्यातच त्यांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील पक्षांपेक्षा वेगळा सुभा मांडून, अन्य पक्षांतील नाराजांना आपल्या आघाडीमार्फत तिकिटे देऊन आणि मोठ्या विरोधानंतरही भाजपाशी समझोता करून नेमके काय पदरात पडते, याचा हिशेब त्यांना मांडावा लागेल. शिवसेनेला कामगिरीत सातत्य ठेवणे गरजेचे आहे. पण शिवसेना, मनसे, एमआयएम, रिपब्लिकन पक्षांचे गट यांना या निवडणुकीत गमावण्याजोगे फारसे काही नाही.

Web Title: Will play again for the power of Bhiwandi again?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.