सासणे गावात दारूबंदी राहणार की उठणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 02:05 AM2017-10-11T02:05:46+5:302017-10-11T02:06:12+5:30
मुरबाड तालुक्यातील सासणे गावातील तरुणांनी गेली ५० वर्षे असलेली दारूबंदी उठवण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीचा मार्ग निवडला आहे.
मुरबाड : मुरबाड तालुक्यातील सासणे गावातील तरुणांनी गेली ५० वर्षे असलेली दारूबंदी उठवण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीचा मार्ग निवडला आहे. तर दुसरीकडे ती ही बंदी कायम रहावी, यासाठी ऊर्वरित गाव एकवटला आहे. त्यामुळे आता या ग्राम पंचायतीवर कोणाची सत्ता येते याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष आहे.
एक तंटामुक्त गाव म्हणून म्हसा पंचक्रोशीत सासणे गावचे नाव घेतले जाते. या गावात पन्नास वर्षे दारु बंदी कायम ठेवण्यात ग्रामस्थ यशस्वी ठरले होते. मात्र, किरकोळ व्यवसाय आणि नोकरीसाठी या गावात आलेल्या चौघांनी बनावट कागदपत्रे सादर करत अचानकच बीयर शॉप सुरू केले. यामुळे ग्रामस्थांना मोठा धक्का बसला. त्यावेळी पदावर असलेल्या महिला सरपंच रेखा खरे यांना ग्रामस्थांनी जाब विचारला. परंतु, आपण या बीयर शॉपला कोणत्याही प्रकारे परवानगी दिली नसल्याचे रेखा खरे यांनी सांगितले. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हे बीयर शॉप बंद करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या माध्यमातून या बीयर शॉपची चौकशी सुरू केली. जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या चौकशी अहवालानुसार या बीयर शॉपसाठी राज्य उत्पादन शुल्क आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बीयर शॉप मालकाने सादर केलेले हे कागदपत्र बोगस असल्याचे सिध्द झाल्याने हे शॉप म्हसा यात्रेपूर्वीच बंद करण्यात आले. त्यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने तब्बल बारा लाखांचा माल हस्तगत केला.
हे दुकान बंद झाल्याने त्याच्या मालकांनी वकिलाच्या सल्ल्याने प्रशासन दरबारी न्याय मागण्याचा प्रयत्न केला असता उत्पादन शुल्क मंत्र्यांनी देखील त्यांना फटकारले. मात्र, त्यानंतर या चौघा मालकांनी दररोजच्या गिºहाईकांशी संधान साधत ग्राम पंचायतीवर आपली सत्ता आल्यास परत बीयर शॉप सुरू करण्याचे आश्वासन दिले. हे चारही मालक निवडणुकीसाठी उभे असून बंद बीयर शॉपमध्येच निवडणुकीचे कार्यालय थाटले आहे.