शिवसेनेला रेल्वे हद्दीतील आंदोलन भोवणार? विनापरवानगी आंदोलनाचा अहवाल रेल्वे सुरक्षा बलाकडून वरिष्ठांना सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 07:27 PM2017-10-03T19:27:57+5:302017-10-03T19:41:08+5:30
मीरारोड व भार्इंदर रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर फेरीवाला व्यवसाय सुरु असल्याचा दावा करीत शिवसेनेने सोमवारी भार्इंदर रेल्वे हद्दीत विनापरवानगी केलेले आंदोलन अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- राजू काळे
भार्इंदर, दि. ३ - मीरारोड व भार्इंदर रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर फेरीवाला व्यवसाय सुरु असल्याचा दावा करीत शिवसेनेने सोमवारी भार्इंदर रेल्वे हद्दीत विनापरवानगी केलेले आंदोलन अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या बेकायदेशीर आंदोलनाचा अहवाल रेल्वे सुरक्षा बलाने वरिष्ठांना सादर केल्याचे रेल्वेच्या सुत्राकडुन सांगण्यात आले.
अलिकडेच एल्फिन्स्टन रोड रेल्वे पादचारी पुलावर झालेली चेंगराचेंगरी मीरारोड व भार्इंदर रेल्वे स्थानकातील पुलावर तेथील फेरीवाल्यांमुळे होऊ नये, यासाठी रेल्वे परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी शिवसेनेने आ. प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी आंदोलन छेडले होते. त्यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांना गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी केल्याचे सांगण्यात आले. परंतु, रेल्वे स्थानका व पादचारी पुलावर फेरीवाले बसतच नसल्याचा दावा रेल्वे सुरक्षा बलाकडुन करण्यात आला आहे. परंतु, उत्तर दिशेकडील पुलाच्या बाजूला मात्र फेरीवाले बसत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार पालिकेचा असल्याचा दावा संबंधित अधिकाऱ्यांनी केला आहे. फेरीवाले नसतानाही काही बोगस फेरीवाल्यांना तेथे आंदोलनापुर्वी बसविण्यात आल्याचा दावा रेल्वेच्या सुत्राकडुन करण्यात आला आहे. त्यांनाच फेरीवाले भासवुन रेल्वेच्या हद्दीत विनापरवानगी आंदोलन छेडल्याचा दावाही सुरक्षा बलाकडुन करण्यात आला आहे. तरीदेखील शिवसेनेने भार्इंदर स्थानकातील पादचारी पुलावर घोषणाबाजी सुरु करुन आंदोलन छेडले. हे आंदोलन बेकायदेशीर असुन ते रोखण्याचा प्रयत्न करणा-या एका सुरक्षा बलाच्या अधिका-याला देखील धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. हा प्रकार काही वृत्तवाहिन्यांवरही दाखविण्यात आल्याने सुरक्षा बलाकडुन त्याचा सविस्तर अहवाल सोमवारीच वरीष्ठांकडे पाठविल्याचे सुत्राकडुन सांगण्यात आले. परंतु, या आंदोलनाची पुर्वकल्पना रेल्वे पोलिसांना दिल्याचे सेनेच्या सुत्राकडुन सांगण्यात आले. आंदोलनादरम्यान बलाच्या जवानांनी सेनेच्या एका नगरसेवकासह तिघांना ताब्यात घेतले होते. मात्र त्यांना काही वेळेतच सोडुन देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. केंद्रांत व राज्यात भाजपासोबत सत्तेत असलेल्या सेनेचे भाजपाशी संबंध काही दिवसांपासून ताणले जात असतानाच सेनेने विनापरवानगी रेल्वेच्या हद्दीत केलेले आंदोलन व सुरक्षा बलाच्या अधिका-यांसोबत केलेल्या आक्षेपार्ह प्रकाराबाबत प्रकरण तापणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यासोबत केलेल्या गैरवर्तनाबाबत बलाच्या जवानात संतापाचे वातावरण निर्माण झाले असुन त्याचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.