भाजपासाठी स्थायीच्या चाव्या शिवसेना सोडणार?
By admin | Published: February 13, 2016 02:40 AM2016-02-13T02:40:09+5:302016-02-13T02:40:09+5:30
स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के यांच्यासह सात सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने आता त्यांच्या जागी नव्या आठ सदस्यांची नेमणूक केली जाणार आहे.
ठाणे : स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के यांच्यासह सात सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने आता त्यांच्या जागी नव्या आठ सदस्यांची नेमणूक केली जाणार आहे. परंतु, या सदस्यांच्या निवडीच्या मुद्यावरून स्थायी समिती सभापतीपदही रिक्त होत असल्याने शिवसेना भाजपाला दिलेला शब्द पाळणार का, याबाबत मात्र उत्सुकता वाढली आहे.
या निवृत्त होणाऱ्या आठ सदस्यांमध्ये सभापती नरेश म्हस्के, रामभाऊ तायडे, सुधीर भगत, राधाफतेबहादूर सिंह, मिलिंद पाटील, सिराज महंमद अली डोंगरे, दीपक वेतकर आणि भाजपाचे संजय वाघुले यांचा समावेश आहे. या सदस्यांच्या जागी २० फेबु्रवारी रोजी होणाऱ्या महासभेत नव्या आठ सदस्यांची नेमणूक केली जाणार आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये शिवसेनेचे चार, भाजपा आणि रिपाइंचा प्रत्येकी एक, राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसच्या एका सदस्याचा समावेश आहे.
दरम्यान, मागील वर्षी स्थायीच्या चाव्या भाजपाला देण्याचे शिवसेनेने मान्य केले होते. ऐन वेळेस शिवसेनेने उमेदवार उभा केला होता. अखेर, भाजपाला माघार घ्यावी लागली आणि स्थायीच्या चाव्या या शिवसेनेच्या हाती आल्या. त्या वेळेस शेवटचे वर्ष भाजपाला दिले जाईल, असे आश्वासन शिवसेनेने दिले होते. परंतु, आता विधानसभा आणि त्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवली निवडणुकीत निर्माण झालेला दुरावा पाहता शिवसेना भाजपाला दिलेला शब्द पाळणार का, याबाबत मात्र शंका उपस्थित झाल्या आहेत.
महिला बालकल्याण, क्रीडा व समाजकल्याण-सांस्कृतिक, शिक्षण समिती, आरोग्य परिरक्षण, गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीच्या प्रत्येकी नऊ सदस्यांची निवडही येत्या महासभेत होणार आहे.