ठाण्याला राहण्यासाठीचे सर्वोत्तम शहर करण्यासाठी प्रयत्न करणार; महापालिका नवनियुक्त आयुक्त सौरभ राव
By अजित मांडके | Published: March 22, 2024 03:10 PM2024-03-22T15:10:38+5:302024-03-22T15:10:51+5:30
प्रभारी महापालिका आयुक्त तथा ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आयुक्तपदाची सूत्रे शुक्रवारी नवनियुक्त आयुक्त सौरभ राव यांच्याकडे दिले.
ठाणे : मी खूप भाग्यवान आहे, की ठाणे या ऐतिहासिक शहरात काम करण्याची संधी मिळाली. माझ्या आधी अभिजीत बांगर, विपिन शर्मा यांनी जे काम केले आहे, त्या कामाला पुढे घेवून जाण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबर सिटी ॲक्शन प्लॅन तयार करणार आहे. याशिवाय हे शहर राहण्यासाठीचे सर्वोत्तम शहर असावे, असा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन ठाणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी आयुक्तपदभार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. याचदरम्यान महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्याबरोबर खर्चाचा भार कमी करण्यासाठी ही प्रयत्न करणार आहे. याशिवाय उत्पन्नाचे विविध स्रोत शोधून त्यातून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रभारी महापालिका आयुक्त तथा ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आयुक्तपदाची सूत्रे शुक्रवारी नवनियुक्त आयुक्त सौरभ राव यांच्याकडे दिले. त्यावेळी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे उपस्थित होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील प्रतिपादन केले. पुढे बोलताना, 'शहरात वाढणारी लोकसंख्या आणि सोबतच शहराचा विकास करण्याचा प्रयत्न ठामपाच्या माध्यमातून करणार आहे. राज्यशासनाने माझ्याकडे महत्वपूर्ण अशी ठाणे शहराची जबाबदारी दिलयाचेही त्यांनी स्पष्ट केले.
तर, आतापर्यत माझा जो प्रशासकीय अनुभव आहे, त्या प्रशासकीय अनुभवाच्या आधारावर निश्चितपणे या शहराला अद्ययावत सोयीसुविधांनी राहण्यासाठी उत्तम शहर असेल अशा पध्दतीने विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे. हे सर्व करताना नागरिकांची दैनंदिन जीवनशैली, अडीअडचणी म्हणजेच वाहतूकीचा विषय, पाण्याचा प्रश्न, ड्रेनेज, अतिक्रमण या विषयावर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करणार आहे. याचबरोबर पुढील 25 वर्षात शहराचा विकास करण्यासाठी जे जे आवश्यक आहे, किंवा जो वाव मला मिळेल तो दृष्टीकोन ठेवून एक ऍक्शन प्लॅन तयार करावा लागेल आहे. त्याच्या आधारावर सर्वांगीण असा शहराचा विकास होईल, हे करत असताना आपले जे प्रयत्न हे पर्यावरणपूरक असू शकतात.असेही ते म्हणाले. त्यातच टेरेस गार्डन तयार करणे अशा पध्दतीचे छोटे छोटे उपक्रम करुन कार्बन न्यूट्रल सिटी म्हणून विकास करण्यासाठी अशा उपक्रमांची मदत होते. हे करत असताना माझी वसुंधरा अभियानाची व्याप्ती कशी वाढविता येईल आणि युवा-तरूण पिढी, शालेय विद्यार्थी यांना या उपक्रमात कशा पध्दतीने सहभागी करुन घेता येईल या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.
माध्यमांशी संवाद साधल्यानंतर आयुक्त सौरभ राव यांनी वरिष्ठ अधिकारी, विभाग प्रमुख यांची बैठक घेतली.
राव हे भारतीय प्रशासन सेवेच्या २००३च्या बॅचचे अधिकारी...
ठाणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव हे भारतीय प्रशासन सेवेच्या २००३च्या बॅचचे अधिकारी आहेत. ठाण्यात रुजू होण्यापूर्वी ते पुणे येथे सहकार आयुक्त या पदावर कार्यरत होते. राव हे मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. त्यांनी लखनऊ विद्यापीठातून राज्य शास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश येथे राज्य सेवेत तसेच भारतीय पोलीस सेवेत अधिकारी म्हणून काम केले.
२००३मध्ये राव भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. २००४मध्ये वर्धा जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी या पदावरून प्रशासकीय सेवेची सुरुवात केली. त्यानंतर, गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नंदूरबारचे जिल्हाधिकारी, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला. पुणे येथे जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, साखर आयुक्त, पुण्याचे विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. ठाण्यात येण्यापूर्वी ते सहकार आयुक्त म्हणून कार्यरत होते.