नवी मुंबई विमानतळाला 'दिबां'चे नाव देण्याकरिता संघर्ष करणार- कपिल पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 12:10 PM2021-07-09T12:10:50+5:302021-07-09T12:15:02+5:30
बुधवारी कपिल पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून, त्यांच्याकडे पंचायत राज विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली.
- नितीन पंडित
भिवंडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या विश्वासाने केंद्रीय राज्यमंत्रिपदाची जबाबदारी माझ्यावर सोपविली असून, मिळालेल्या संधीचा फायदा देश विकासासाठी जास्तीत-जास्त कसा होईल, त्याचबरोबर आपली जन्मभूमी असलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघाबरोबरच ठाणे जिल्ह्याचा विकास कसा होईल, याकडे आपण विशेष लक्ष देणार असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी `लोकमत`कडे केले. ठाणे जिल्ह्यातील सर्व निवडणुकांत भाजपची पताका डौलाने फडकवत ठेवण्याकरिता पक्ष सोपवेल ती जबाबदारी पार पाडण्याची ग्वाही पाटील यांनी दिली.
बुधवारी कपिल पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून, त्यांच्याकडे पंचायत राज विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली. पदाची शपथ घेतल्यानंतर पाटील यांनी पहिल्यांदा `लोकमत`ला प्रतिक्रिया दिली. ठाणे जिल्ह्यातील आगामी महापालिका निवडणुकांमध्ये पाटील नेमकी काय भूमिका बजावणार, तुमचा सामना शिवसेनेसोबत होणार का, असे विचारले असता ते म्हणाले की, आता मी देशाचा राज्यमंत्री झालो आहे. त्यामुळे देशाचा विकास व देशाचे काम करण्याची संधी मला मिळाली असून, त्याकडेच सध्या माझे लक्ष आहे.
नवी मुंबईत विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यावरून आंदोलन सुरू आहे. त्याबाबत विचारले असता पाटील म्हणाले की, नवी मुंबई विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी माझ्यासह स्थानिक भूमिपुत्रांची मागणी आहे. नवी मुंबई विमानतळाकरिता भूमिपुत्रांनी त्याग केला आहे. त्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर केला गेलाच पाहिजे. त्याबाबत राज्य सरकार कोणती भूमिका घेते, याकडे आमचे लक्ष आहे.