पर्यवेक्षकाच्या चुकीने आयटीआयच्या ३० विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 12:58 AM2020-01-16T00:58:38+5:302020-01-16T00:58:56+5:30
पुनर्मूल्यांकन करणार : महाविद्यालय प्रशासनाचा दावा
ठाणे : वागळे इस्टेट येथील आयटीआय परीक्षेदरम्यान चुकीचे मार्गदर्शन केल्याने एकाचवेळी ३० विद्यार्थ्यांना शून्य गुण देण्यात आले. त्यामुळे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी मनविसेकडे धाव घेताच त्यांनी तत्काळ आयटीआय महाविद्यालयावर धडक देऊन प्रशासनाला धारेवर धरले. त्यामुळे महाविद्यालय प्रशासन ताळ्यावर आले असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणाचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. याबाबत महाविद्यालय प्रशासन काळजी घेणार असून या प्रकाराला जबाबदार शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी मनविसेने केली आहे.
अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा अर्थात आयटीआयच्या माध्यमातून जुलै २०१९ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल ८ डिसेंबर रोजी आॅनलाइन घोषित करण्यात आला. प्रथम वर्ष वर्गातील विद्यार्थ्यांच्या या वार्षिक परीक्षेत टर्नर व फिटर प्रवर्गांतील तब्बल ३४ जणांना शून्य गुण देण्यात आले. याबाबत विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधला, तेव्हा परीक्षेदरम्यान वर्गात पर्यवेक्षक असलेल्या मुरलीधर सरवदे या शिक्षकाने उत्तरपत्रिकेवर लिहिली जाणारी माहिती चुकीची सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असल्याचे मनविसे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी सांगितले. पाचंगे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहराध्यक्ष किरण पाटील, सचिव सचिन सरोदे यांनी महाविद्यालय प्रशासनाची भेट घेतली. त्यांना धारेवर धरून जाब विचारला.
प्रशासनानेही मनविसेच्या पदाधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेऊन याप्रकरणी आयटीआयचे प्राचार्य एस.एम. अंबाळकर यांना लेखी निवेदन दिले. वरिष्ठ पातळीवर याबाबत दखल घेऊन कार्यवाही करण्याचे आदेश दिले. यावेळी उपविभाग अध्यक्ष विनोद भुवड, मनविसे उपविभागाध्यक्ष गणेश शेलार, प्रसाद होडे, शाखाध्यक्ष संदीप पवार, उपशाखाध्यक्ष प्रवीण जाधव व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
‘पर्यवेक्षकाकडून आम्हाला चुकीचे मार्गदर्शन’
आम्हाला पर्यवेक्षकाकडून चुकीचे मार्गदर्शन करण्यात आले. परंतु, शिक्षक विद्यार्थ्यांवर खापर फोडत असल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. तर, विद्यार्थ्यांना जेव्हा चूक समजली, तेव्हा त्यांनी तत्काळ सांगायला हवी होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचीदेखील चूक आहे, अशी सारवासारव प्राचार्य अंबाळकर यांनी केली. तरीही, आम्ही वरिष्ठ पातळीवर पुनर्मूल्यांकनाची मागणी केली असल्याचे ते म्हणाले.