स्टेमकडून वाढीव १० एमएलडी पाणी ठाण्याला मिळणार का? स्टेमच्या कारभाराचा महापौरांनी घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 09:58 PM2020-12-02T21:58:47+5:302020-12-02T21:59:14+5:30
Thane : ठाणे महापालिकेला पाणी स्टेमकडून हक्काचे कमी पाणी मिळत नसताना बिल्डरांना मात्र स्टेमकडून बेकायदेशीर पाणीपुरवठा होत असल्याचेही बैठकीतून उघड झाले आहे.
ठाणे : स्टेमकडे वाढीव १० एमएलडी पाणी पुरवठा मिळावा, यासाठी महापालिकेकडून वारंवार संबधींत यंत्रणोला पत्रव्यवहार करण्यात येत आहे. मात्र, अद्यापही त्यांच्याकडून हा वाढीव पाणी पुरवठा करण्यात आलेला आहे. त्यातही स्टेम प्राधिकरणात सर्वात मोठा वाटा हा ठाणे महापालिकेचा आहे. स्टेम प्राधिकरणाच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष स्वत: ठाण्याचे महापौर असताना ठाणे महापालिकेला वगळून मीरा- भाईंदर आणि भिवंडी यासारख्या महापालिकांना मंजूर कोट्यापेक्षा अधिकचे पाणी दिले जात असल्याची धक्कादायक माहिती बुधवारी झालेल्या उघड झाली आहे. विशेष म्हणजे एकीकडे ठाणे महापालिकेला पाणी स्टेमकडून हक्काचे कमी पाणी मिळत नसताना बिल्डरांना मात्र स्टेम कडून बेकायदेशीर पाणीपुरवठा होत असल्याचेही या बैठकीतून उघड झाले आहे. तर स्टेम प्राधिकरणाच्या कारभाराबाबत ठाणो महापालिकेच्या अभियंत्यांनी देखील तक्रारीचा सूर लावल्यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी याची गंभीर दाखल घेत स्टेमच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. दोन दिवसांत ठाण्याला १० एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
याशिवाय, यापुढे स्टेमचा अनियमित कारभार खपवून घेणार नसल्याचा सज्जड दमच महापौरांनी ठाणे महापालिकेत झालेल्या बैठकीत दिला आहे. स्टेम प्राधिकरणाकडून ठाणे महापालिकेला होणार अनियमित तसेच वेळेवर न होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत महापौर नरेश म्हस्के यांनी बुधवारी ठाणे महापालिकेच्या बल्लाळ सभागृहात स्टेम प्राधिकरणाचे अभियंता, लोकप्रतिनिधी आणि ठाणो महापालिकेच्या अधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक आयोजित केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी सुरु वातीलाच पालिका आयुक्तांनी स्वत: स्टेमकडे पत्रव्यवहार करून १० एमएलडी अतिरिक्त पाण्याची मागणी केली होती, त्याची अंमलबजावणी अद्याप स्टेम कडून झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. २० मे २०२० चा एक ठराव करण्यात आला असून यामध्ये खाजगी एजन्सीला पाणी वाटप करण्याचा अधिकार देण्यात आला असून ठाणो महापालिकेला विचारात न घेता स्टेम प्राधिकरणाने हा ठराव मंजूर कसा केला असा प्रश्न देखील मुल्ला यांनी या बैठकीत उपस्थित केला आहे.
स्टेम प्राधिकरणाच्या अभियंत्यांकडून मात्न ठाणे महापालिकेला दररोज ११३ एमएलडी पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा या बैठकीत करण्यात आला आहे. वाढीव पाणी देण्यासाठी काही तांत्रिक अडचणी असल्याचा खुलासा केल्यानंतर इतर महापालिकांना अतिरिक्त पाणी पुरवठा करताना या गोष्टी का आड येत नाही असा प्रश्न यावेळी लोकप्रतिनिधीनी उपस्थित केला. या सर्व ठाणो महापालिकेच्या अभियंत्यांनी देखील स्टेम प्राधिकरणाबाबत तक्रारीचा सूर लावल्यानंतर अखेर महापौर नरेश म्हस्के यांनी स्टेमच्या अभियंत्यांची चांगलीच कान उघाडणी करत दोन दिवसात ठाण्याला १० एमएलडी पाणीपुरवठा करण्याचे आदेश या बैठकीत दिले आहे. या बैठकीत स्थायी समिती सभापती संजय भोईर, उपमहापौर पल्लवी कदम, नगरसेवक हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला, संजय वाघुले, उमेश पाटील, सुधीर कोकाटे तसेच अतिरिक्त आयुक्त गणोश देशमुख उपस्थित होते.
दरम्यान, या बैठकीत स्टेम प्राधिकरणावर जिल्हा परिषदेचे सीइओ हे एम डी म्हणून काम पाहत असले तरी कोणत्याच सीईओ कडून या प्राधिकरणाकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी या बैठकीत सांगितले. त्यामुळे ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तांची या ठिकाणी निवड करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. स्टेम प्राधिकरणाकडून महापालिकेला पाणी देणो गरजेचे असताना खाजगी गृहसंकुलांना परस्पर पाणी दिले जाते व ही मंडळी नियमित पैसे देखील देत नसल्याचे निदर्शनास येत असल्याचे सांगत खाजगी गृहसंकुलांना पाणी देण्याबाबतचे प्रस्ताव रद्द करावेत तसेच मागील काही महिन्यांमध्ये ३५ वेळा ब्रेकडाऊन केल्याने ठाण्यातील पाणी वितरण व्यवस्थेवर परिणाम होत असून शेवटच्या टोकापर्यत पाणी पोहचत नाही याबाबत सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता तातडीने करण्याचे निर्देश महापौर यांनी यावेळी दिले.
स्टेम प्राधिकरणाच्या गव्हर्निंग कौन्सिलचा अध्यक्ष मी आहे. कोरोना काळात जे स्टेम प्राधिकरणाकडून काही चुकीचे निर्णय झाले असतील त्याला आम्ही मान्यता दिलेली नाही. ठाण्यातील आणि मिरा-भाईंदरच्या लोकांना पाणी न देता बिल्डरला गृहसंकुलाना पाणी देण्याचे प्रस्ताव मंजूर झाले असतील, काही नवीन प्रस्ताव मंजूर झाले असतील, काही लोक पाणी पुरवठा घेत आहेत पण बिल भरत नसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. - नरेश म्हस्के - महापौर, ठामपा