टोलचं आंदोलन पेटणार?; उपोषण करणाऱ्या अविनाश जाधवांची राज ठाकरे भेट घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 10:51 AM2023-10-08T10:51:05+5:302023-10-08T10:51:52+5:30
आमचा गांधी सप्ताह साजरा झाला, आता उद्यापासून आम्ही भगतसिंगाच्या मार्गाने जाऊ असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला.
ठाणे – टोलवाढीविरोधात गेल्या ४ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या मनसे नेते अविनाश जाधव यांच्या भेटीसाठी राज ठाकरे जाणार आहेत. ठाणे-मुलुंड टोलचे दर वाढवल्याने मनसेकडून आंदोलन करण्यात येत आहे. मनसे नेते अविनाश जाधव आणि कार्यकर्त्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. परंतु प्रशासनकडून कुठलीही हालचाल होत नसल्याने आता राज ठाकरे याबाबत काय भूमिका घेतायेत हे पाहणे गरजेचे आहे.
याबाबत अविनाश जाधव म्हणाले की, मागील अनेक वर्षापासून आम्ही आंदोलनात सहभागी झालो, बरेच विषय हाताळले. समाजातील काही घटक आहेत त्यांचे म्हणणं असते की, मनसे नेहमी तोडफोड, मारहाण यातून आंदोलन करते. आम्ही ठाणेकरांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या टोल विषयावर गेल्या ८ दिवसांपासून आंदोलन करतोय. आम्ही मानवी साखळी तयार केली, गुलाबाची फुले दिली. आम्ही ठाण्याच्या प्रत्येक चौकात बोर्ड घेऊन उभे राहिलो. मागच्या ४ दिवसांपासून उपोषण करतोय परंतु मनसे स्टाईलनं आम्ही आंदोलन केले तर दुसऱ्या क्षणी निर्णय घेतला जातो. आता आम्ही शांततेने आंदोलन करतोय परंतु कुणीही दखल घेत नाही असं त्यांनी म्हटलं.
तसेच आमचा गांधी सप्ताह साजरा झाला, आता उद्यापासून आम्ही भगतसिंगाच्या मार्गाने जाऊ. जर उपोषणाला बसून यांच्याकडे वेळ नसेल आणि निर्णय येणार नसेल तर ठाणेकरांसाठी आम्ही यापुढे रस्त्यावर उतरू. टोलनाका आंदोलनाची सुरुवात धर्मवीर आनंद दिघेंनी १९९९ मध्ये सुरू केली होती. त्यावेळी टोल झालाही नव्हता. त्यानंतर अनेक नेत्यांनी दखल घेतली होती. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोल बंद व्हावा यासाठी याचिका दाखल केली होती. आज ते निर्णय घेऊ शकत नाही. टोल बंद करणे सोडा परंतु टोलदर वाढला यापेक्षा दुर्दैव काही नाही असा आरोपही अविनाश जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.
दरम्यान, आतापर्यंत राज ठाकरेंनी जे आदेश दिलेत ते आम्ही तंतोतंत पाळलेत. आज राज ठाकरे आमच्या भेटीला येणार आहेत त्यामुळे आज जे काही साहेब सांगतिल तो आदेश आम्ही पाळू असा इशाराही मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे.