यंदा बारावीची परीक्षा हाेणार की नाही? विद्यार्थी, पालक चिंतित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 08:48 AM2021-05-10T08:48:38+5:302021-05-10T09:00:39+5:30
राज्यातील बारावीच्या पार्श्वभूमीवर सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. वर्षभरापेक्षा अधिक काळ झाला. आम्ही अभ्यास करत आहाेत. तरीही बारावी परीक्षेबाबत स्पष्टता नसल्यास बारावीचा अभ्यास करावा की स्पर्धां परीक्षांचा हा विचार विद्यार्थ्यांना अडचणीत टाकत आहे.
ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा सीबीएसई बोर्डाने रद्द केल्यानंतर राज्य सरकारनेही एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण मे महिना सुरू झाला तरी बारावीच्या परीक्षेचा निर्णय राज्य सरकारने घेतला नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांत चिंतेचे वातावरण आहे. ठाण्यातील विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षेबाबत लवकर निर्णय घेऊन आमच्यावर असलेला ताण दूर करावा, अशी मागणी केली आहे. एक तर अंतर्गत मूल्यमापन करून पास करा किंवा परीक्षेचा निर्णय तरी घ्या, असे विद्यार्थी आणि पालकांनी सरकारला सुचविले आहे.
राज्यातील बारावीच्या पार्श्वभूमीवर सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. वर्षभरापेक्षा अधिक काळ झाला. आम्ही अभ्यास करत आहाेत. तरीही बारावी परीक्षेबाबत स्पष्टता नसल्यास बारावीचा अभ्यास करावा की स्पर्धां परीक्षांचा हा विचार विद्यार्थ्यांना अडचणीत टाकत आहे.
विद्यार्थी मानसिक तणावामध्ये आहेत. सरकारने ऑफलाइन परीक्षा न घेता इयत्ता दहावीप्रमाणे अंतर्गत मूल्यमापनाने किंवा इतर पर्यायांचा विचार करून विद्यार्थ्यांना पास करावे, अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी असल्याचे विद्यार्थिनी प्रज्ञा माेरे हिने सांगितले, तर सेजल रांगळे ही विद्यार्थिनी म्हणते की, सातत्याने बारावीच्या परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहेत. त्यात कोरोनाची परिस्थिती असल्याने याचा दुष्परिणाम आमच्या अभ्यासावर होत आहे.
एकीकडे कोरोनाची भीती, त्यात परीक्षेचा गोंधळ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मानसिक ताण वाढत आहे. तारखा पुढे ढकलल्या जात असल्याने अभ्यासातही मन रमेनासे झाले आहे.
मी बारावीमध्ये असून, या वर्षाची परीक्षा कधी होईल ते अद्याप माहीत नाही. मला आता ५० टक्के इंटरनल गुण व ५० टक्के गुण ऑनलाइन परीक्षा घेऊन देण्यात यावे. जर ऑफलाइन परीक्षा द्यावी लागली तर लवकरात लवकर टाइमटेबल द्यावे. त्यात दोन पेपरमध्ये जास्त वेळ असावा. तोच तोच अभ्यास करून आता डोके थकून गेले आहे. कधी एकदा परीक्षा होते याचीच वाट बघत आहाेत.
- रोहित पांढरे, विद्यार्थी
मुलांच्या परीक्षेचा ताण पालकांवरही असतो. बारावीच्या परीक्षेबाबत निर्णय होत नसल्याने सर्वांवरच टांगती तलवार आहे. विद्यार्थ्यांबरोबर पालकांचा विचार करून ठोस निर्णय लवकर सरकारने घ्यावा. असे किती दिवस तणावात काढायच ?
- संध्या नाकती, पालक