नव्या वर्षात उल्हासनगरचा विकास होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 11:59 PM2019-12-29T23:59:20+5:302019-12-29T23:59:40+5:30

उल्हासनगरमध्ये कलानी कुटुंबाकडे आमदारसह महापौरपद असतानाही त्यांना शहराचा विकास साधता आला नाही.

Will Ulhasnagar be developed in the new year? | नव्या वर्षात उल्हासनगरचा विकास होणार का?

नव्या वर्षात उल्हासनगरचा विकास होणार का?

Next

- सदानंद नाईक, उल्हासनगर

सरत्या वर्षात शहरात राजकीय सत्तांतरे घडून राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी कलानी कुटुंबाला शिवसेनेसोबत घरोबा करण्याची नामुश्की ओढवली. उल्हासनगरमध्ये कलानी कुटुंबाकडे आमदारसह महापौरपद असतानाही त्यांना शहराचा विकास साधता आला नाही. भाजपने कोंडीत पकडताच त्यांना धडा शिकविण्यासाठी ओमी कलानी यांच्यावर शिवसेनेशी जवळीक साधण्याची वेळ आली. २०१४ मध्ये मोदीलाटेत ज्योती कलानी राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदारपदी निवडून आल्या. पुन्हा एकदा शहरातील राजकारण कलानी कुटुंबाभोवती फिरू लागले. पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी यांच्याकडे राष्ट्रवादीचा भावी नेता म्हणून बघितले जात होते. मात्र, ऐन महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे बहुतांश नगरसेवक व पदाधिकारी घेऊन ओमी यांनी ओमी टीमची स्थापना करून भाजपसोबत महाआघाडी केली.

महापालिका निवडणुकीत भाजपसोबत ओमी टीमने आघाडी करून पालिकेत सत्ता खेचून आणली. विधानसभा निवडणुकीत कलानी कुटुंबाला उमेदवारी देण्याचा शब्द भाजपने फिरविल्याने, ज्योती कलानी यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपला धडा शिकविण्यासाठी ओटी टीमने महापौरपदाच्या निवडणुकीत टीम समर्थक १० नगरसेवकांनी बंडखोरी करत शिवसेनेच्या लीलाबाई अशान यांना मतदान करून महापौरपदी निवडून आणले. तर उपमहापौरपदाची लॉटरी रिपाइंचे भगवान भालेराव यांना लागली. राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी कलानी कुटुंबाने शिवसेनेसोबत अप्रत्यक्ष जाण्याचे ठरविले.

पोलीस विभागाचा चेहरा उघड
शिवसेनेच्या नगरसेविका वसुधा बोडारे व ज्योत्स्ना जाधव यांनी गेल्या महासभेत शहर दारूबंदीचा अशासकीय प्रस्ताव आणला होता. बहुतांश नगरसेवकांनी प्रस्तावाला पाठिंबा देत शहरात गुन्हेगारीसह अमलीपदार्थाची विक्री वाढल्याचे सांगितले. लॉजिंग-बोर्डिंग, बार, डान्स बार व हॉटेल अनैतिक व्यवसायाचे केंद्र झाल्याचे सांगितले.

रस्त्यांची कामे निकृष्ट
महापालिका हद्दीतील रस्ते चकाचक करण्यासाठी एमएमआरडीएने तब्बल १२५ कोटींचा निधी दिला. मात्र, त्या निधीतून कामे बरोबर होतात का? याची चौकशी करण्याची वेळ महापालिका प्रशासनासह सत्ताधारी व विरोधकांवर आली आहे. संथगतीने सुरू असलेल्या बहुतांश रस्त्याला एका वर्षात तडे गेले असून सिमेंट गायब होऊन नुसती खडी दिसत आहे. तशीच परिस्थिती भुयारी गटार योजनेची आहे. योजनेंंतर्गत ८२ कोटींच्या निधीतून वालधुनी नदीकिनारी मुख्य मलनि:सारण वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. वडोलगाव व शांतीनगर येथे मलनि:सारण केंद्र बांधण्यात येत असून ३१ डिसेंबरपूर्वी दोन्ही केंद्रे सुरू होण्याची शक्यता आयुक्त सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केली. मात्र, अद्यापही १०० टक्के काम केंद्राचे झाले नसल्याचे उघड झाले आहे.

विकासयोजनेचा बोजवारा
उल्हास नदीला प्रदूषित करणाऱ्या २६ कोटींच्या खेमानी नाल्याचे काम संथगतीने असून योजनेवरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. डम्पिंग ग्राउंडची परिस्थिती भयानक असून हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आनंदाची बाब म्हणजे राज्य सरकारने उसाटणे येथील ३० एकर जागा कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी देण्यास तत्त्वत: मान्यता दिली. साफसफाईचा बोजवारा नेहमीचा असून स्वच्छता सर्वेक्षण नावालाच आहे. पालिका शाळेविषयी मार्गी लागत नसून विद्यार्थ्यांवर खाजगी शाळेच्या इमारतीवर धडे गिरविण्याची वेळ आली आहे. मालमत्ताकर विभागातील घोटाळे थांबण्याचे नाव घेत नाही. तसेच नगररचनाकार विभागाचे काम ठप्प पडून पालिकेचे कोट्यवधींचे उत्पन्न गेल्या अनेक वर्षांपासून बुडीत निघाले आहे. एलबीटी विभाग नावाला असून कर्मचाऱ्यांच्या वेतना एवढेही उत्पन्न मिळत नसल्याचे उघड झाले.

Web Title: Will Ulhasnagar be developed in the new year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.