पक्षात राहणार की जाणार?
By admin | Published: June 26, 2017 01:31 AM2017-06-26T01:31:17+5:302017-06-26T01:31:17+5:30
मीरा-भार्इंदर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई आहे
राजू काळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
भार्इंदर : मीरा-भार्इंदर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई आहे. पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असलेल्यांना पक्ष सोडून जाऊ नये, असे आवाहन वरिष्ठांकडून करण्यात येत आहेत. याला मान देत राष्ट्रवादी सोडायची की टिकवायची, यासाठी थेट पक्षातील इच्छुकांसह पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष जयंत पाटील यांनी बैठक बोलावली होती.
अत्यवस्थ झालेल्या राष्ट्रवादीला तारण्यासाठी जिल्हाध्यक्ष पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांसह प्रदेश पातळीवरील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला टिकवण्यासाठी कंबर कसली. परंतु, त्याची दखल वरीष्ठ पातळीवरून घेतली जात नसल्याची खंत पदाधिकाऱ्यांमध्ये रूजू लागली. अनेकदा पक्षबांधणीसाठी पक्षातंर्गत बदलांबाबत सूचना करुनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या प्रतिसादासाठी अल्टीमेटम दिला. त्यालाही वाटाण्याच्या अक्षता लावल्याने अखेर राष्ट्रवादी रिकामी होण्याची वेळ येऊन ठेपली. सर्व पदाधिकारी काँग्रेसचा हात पकडण्यासाठी प्रयत्नशील झाले.
दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्यावतीने झालेल्या इफ्तार पार्टीला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावत लवकरच काँग्रेसवासी होण्याचे संकेत दिले होते. राष्ट्रवादीतील ही अस्वस्थता ‘लोकमत’ने शनिवारच्या अंकात मांडली. त्यामुळे वरिष्ठांनी त्वरित जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधून अंतर्गत बदल्यांसह नवीन नियुक्तयांच्या सूचना मान्य केल्याने तुम्ही पक्ष सोडू नका, अशा आणाभाका घालण्यास सुरूवात केली.
परंतु, अनेकदा सूचना करुनही त्याची दखल शेवटच्या क्षणापर्यंत घेतली गेली नाही. यामुळे व्यथित झालेल्या पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी सोडण्याचा निर्धार केला. वरिष्ठांनी वेळीच लक्ष घातले असते तर पक्षावर ही वेळ आली नसती असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.