आता तरी जाग येईल का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 02:21 AM2019-10-23T02:21:33+5:302019-10-23T06:22:45+5:30

रिक्षाचा प्रवास असुरक्षित; ‘त्या’ घटनेमुळे चिंतेचे वातावरण

Will you wake up now? | आता तरी जाग येईल का?

आता तरी जाग येईल का?

googlenewsNext

- प्रशांत माने

कल्याण : रिक्षाचालकांची मुजोरी आणि मनमानी भाडेवसुलीच्या त्रासाला प्रवाशांना सामोरे जावे लागत असताना कल्याणमध्ये नुकतीच एक संतापजनक घटना घडली. रिक्षात बसलेल्या एका अल्पवयीन मुलीसोबत रिक्षाचालकाने अश्लील भाषेत बोलत घृणास्पद कृत्य केल्याचा प्रकार घडला आहे. एकीकडे अवैध रिक्षा चालवणाऱ्यांकडे वाहतूक प्रशासन यंत्रणेचे दुर्लक्ष झाले असताना नुकत्याच घडलेल्या प्रकारानंतर तरी संंबंधित यंत्रणेचे डोळे उघडतील का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

पश्चिमेत राहणारी १४ वर्षांची मुलगी शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना एका रिक्षाचालकाने प्रवासादरम्यान तिच्याशी अश्लील कृत्य केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. त्यामुळे रिक्षाचा प्रवास असुरक्षित झाल्याचे पुन्हा उघड झाले आहे. रिक्षांची वाढती संख्या पाहता परवान्यांचे वाटप थांबवा, अशी मागणी रिक्षा संघटना सातत्याने करत आहे. रोजगाराचे कारण देत हे परवाने सरकारने सुरूच ठेवले असताना दुसरीकडे परवान्यांची ही खिरापत रिक्षा व्यवसायाच्या मुळावर उठली आहे.

कल्याण असो अथवा डोंबिवली, आज अनेक रिक्षा अवैध व्यवसाय करत आहेत. पासिंगविना त्या रस्त्यावर धावत आहेत. रिक्षा चालवणाºया चालकांकडे परवाना आणि बॅज असणे बंधनकारक आहे. काही रिक्षाचालक बॅज आणि परवाना नसलेल्या व्यक्तींना रिक्षा चालवायला अथवा भाड्याने देत आहेत. रिक्षाचा प्रवास असुरक्षित झाला असताना एका रिक्षाचालकाने अल्पवयीन शाळकरी मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार नुकताच घडला आहे.

पोलिसांकडून त्यांच्या स्तरावर कारवाई केली जाईल, पण अशाप्रकारच्या घटना होऊ नयेत म्हणून संबंधित प्रशासकीय यंत्रणा खबरदारी घेतील का? याबाबत सवाल उपस्थित होत आहे. अवैध रिक्षा व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली जाते, असे दावे नेहमीच आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून केले जात असले तरी कल्याणमध्ये नुकत्याच घडलेल्या घटनेतून बोध घेऊन आता तरी संबंधित यंत्रणेने डोळसपणे कारवाई करावी,अशी मागणी होत आहे.

आरटीओ, वाहतूक शाखेचे होतेय अक्षम्य दुर्लक्ष

रिक्षाचालकांना गणवेश बंधनकारक आहे, पण आजच्या घडीला १५ ते १६ वर्षांची मुले बर्मुडा, हाफ पॅण्ट, टी-शर्ट अशा पेहरावात रिक्षा चालवताना दिसत आहेत. त्यातील अनेक जण गुटखा, मावा, मद्यपान, चरस आणि गांजाचे व्यसन करतात. रिक्षा स्टॅण्ड सोडून भाडे घेणे, उद्धट, उर्मट वागणूक त्याचबरोबर मनमानी भाडेआकारणीही त्यांच्याकडून केली जात असल्याचे चित्र कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये

बहुतांश ठिकाणी पाहायला मिळत आहे.

अशा वर्तणुकीमुळे प्रामाणिक व्यवसाय करणारा रिक्षाचालकही बदनाम होत आहे. याकडे आरटीओ आणि वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत असताना प्रवाशांना मारहाण करणे, एकट्या दुकट्या प्रवाशाला अज्ञात स्थळी नेऊन लुटणे असे प्रकार आधीही घडले आहेत. प्रवाशाजवळील मोबाइल, रोकड तसेच सोने चांदीचे दागिने लुबाडण्याच्या घटनाही सहप्रवाशाकडून रिक्षात घडल्या आहेत.

Web Title: Will you wake up now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.