जीव गेल्यावरच जाग येणार का?; केडीएमसीच्या सफाई कामगारांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 12:26 AM2019-08-09T00:26:45+5:302019-08-09T00:27:02+5:30
जीर्ण बांधकामामुळे कोसळतेय प्लास्टर
कल्याण : केडीएमसी हद्दीतील अतिधोकादायक बांधकामांचा प्रश्न गंभीर बनला असताना महापालिकेच्या स्वत:च्या वास्तू सुस्थितीत नाहीत. शहरातील बांधकाम धोकादायक आणि अतिधोकादायक म्हणून जाहीर करताना आपल्या सफाई कामगारांच्या जीर्ण झालेल्या वसाहतींची डागडुजी करायला प्रशासनाला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे धोकादायक अवस्थेतील या वसाहतींमध्ये छताचे प्लास्टर कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. दोन दिवसांपूर्वीच पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड परिसरातील भवानी निवास येथे प्लास्टर पडल्याची घटना घडली आहे. वारंवार लक्ष वेधूनही याकडे होत असलेला कानाडोळा पाहता जीव गेल्यावरच जाग येणार का, असा संतप्त सवाल रहिवाशांकडून होत आहे.
महापालिकेची स्थापना १९८३ मध्ये झाली. पण, नगरपालिकेच्या आधीपासूनच सफाई कामगारांच्या वसाहती कल्याण-डोंबिवलीत आहेत. सफाईचे काम करणारे हे प्रामुख्याने आदी द्रविड, रूखी, मेहतर आणि वाल्मीकी समाजाचे आहेत. हा समाज कल्याणमध्ये अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. सध्या पाच ते सहा सफाई कामगारांच्या वसाहती महापालिका हद्दीत आहेत. परंतु, ज्यांच्यावर शहराच्या स्वच्छतेची भिस्त आहे, अशा सफाई कामगारांच्या वसाहतींकडे मात्र प्रशासनाचे पुरते दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.
सध्या बहुतांश वसाहतींची बांधकामे जीर्ण अवस्थेत आहेत. १९७५ मध्ये उभ्या राहिलेल्या भवानी निवास या इमारतीची अवस्था अधिकच बिकट आहे. तळ अधिक दुमजली असलेल्या या इमारतीत सफाई कामगारांची १५ कुटुंबे वास्तव्याला आहेत. याठिकाणी छताला असलेले प्लास्टर कोसळण्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. गेल्या वर्षी छताचे प्लास्टर कोसळून हझुबाई परमार (७०) या निवृत्त सफाई कामगार जखमी झाल्या होत्या. यानंतरही ठोस उपाययोजना केली न गेल्याने प्लास्टर कोसळण्याच्या घटना आजही सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वीच या इमारतीच्या छताचे प्लास्टर बाजूकडील घरावर कोसळले. त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, घराचे नुकसान झाले. पावसात भिंतींना ओल धरली आहे. त्यात बहुतांश ठिकाणी प्लास्टर निघाल्याने भिंतीमधील सळया बाहेर आल्या आहेत. यात धोकादायक इमारतीचा भाग शेजारच्या चाळींवर तसेच घरांवर कधी कोसळेल, याचा नेम नसल्याने या धोकादायक इमारतीसह आजूबाजूच्या घरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. यासंदर्भात वारंवार ‘क’ प्रभाग कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. पण, कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही. दरम्यान, यासंदर्भात महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
मोफत घरांचे काय झाले
केंद्र असो अथवा राज्य सरकारने अनेक योजना जाहीर केल्या. यात पंतप्रधान आवास योजना, श्रमसाफल्य आवास योजना तसेच बीएसयूपीचा समावेश आहे. पण, सफाई कामगारांना या योजनेत सामावून घेतलेले नाही.
ठाणे, उल्हासनगर, सोलापूर, अलिबाग, अकोले याठिकाणच्या महापालिका प्रशासनाने सफाई कर्मचाऱ्यांच्या नावे घरे केलेली आहेत, पण आपल्याकडे याची अंमलबजावणी का नाही, असा सवाल महाराष्ट्र रूखी ज्ञाती समाज या संघटनेचे पदाधिकारी दीपक चव्हाण, वसंत सोलंकी आणि विनोद चव्हाण यांनी केला आहे.
ज्या सफाई कामगारांनी २५ वर्षे सलग सेवा बजावली, त्यांना मोफत घरे देण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. पण, त्याकडेही केडीएमसीचे दुर्लक्ष झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
स्ट्रक्चरल आॅडिट तुम्हीच करा
संबंधित वसाहत केडीएमसीची असताना स्ट्रक्चरल आॅडिट तुम्हीच करा, असे रहिवाशांना सांगण्यात आले आहे. नोटीस बजावण्यापुरतीच प्रशासनाची कार्यवाही मर्यादित आहे. पर्यायी व्यवस्था करून या इमारतीच्या वास्तूची डागडुजी करण्याचा कोणताही प्रयत्न प्रशासनाकडून केला जात नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
‘ते’ आश्वासनही बासनात
कामगारांच्या हक्कांसाठी तसेच मागण्यांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग नेमण्यात आला आहे. परंतु, या आयोगाचे काम आजवर केवळ बैठका घेण्यापुरतेच मर्यादित आहे. मागील वर्षी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मनोहर झाला आणि राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामोजी पवार यांनी केडीएमसी हद्दीतील वसाहतींची पाहणी केली होती. त्यावेळी घर मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण, आजतागायत ठोस कार्यवाही झालेली नाही.