जिल्हा परिषद चार हजार वनराई बंधारे बांधण्यास मुकणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 12:00 AM2019-12-01T00:00:13+5:302019-12-01T00:00:26+5:30
आता गेल्या काही दिवसांपासून बंधारे बांधण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. मात्र, बहुतांशी ठिकाणच्या वाहत्या पाण्याचा प्रवाहच बंद झालेला आहे.
- सुरेश लोखंडे
ठाणे : लांबलेला पावसाळा आणि त्यात अवकाळी पावसाची भर यामुळे आता वाहत्या पाण्याचे ओढे, नाले आणि ओहळ आदींची शोधाशोध जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांना करावी लागत आहे. बहुतांशी ठिकाणी आधीच पाण्याचा वाहता प्रवाह बंद झालेला आहे. यामुळे आता वनराई बंधारे बांधण्याचा सुमारे साडेचार हजारांचा लक्ष्यांक गाठणे ठाणे जिल्हा परिषदेला अवघड झाले आहे.
जिल्ह्यातील गावखेड्यांमधील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासह रब्बीच्या पिकांना आवश्यक पाणीसाठा उपलब्ध व्हावा, त्याद्वारे शेतकऱ्यांना सहज जास्त उत्पन्न घेता यावे, याशिवाय माळरानात जनावरांसाठी, पशुपक्ष्यांकरितादेखील जंगलात पाणी उपलब्ध व्हावे, हे हेतू लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने यंदा साडेचार हजार वनराई बंधारे लोकसहभागातून बांधण्याचे काम हाती घेतले. मात्र, यंदा पावसाळाही लांबला. त्यापाठोपाठ अवकाळी पावसाचा तडाखा, यामुळे नदी, नाले ओढे दुथडी भरून वाहत असल्यामुळे वनराई बंधारे बांधण्याच्या कामात अडथळे निर्माण झाले. आता गेल्या काही दिवसांपासून बंधारे बांधण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. मात्र, बहुतांशी ठिकाणच्या वाहत्या पाण्याचा प्रवाहच बंद झालेला आहे. यामुळे त्या ठिकाणी तसाही बंधारा बांधण्याची गरज राहिली नाही. यामुळे आतापर्यंत जिल्हा परिषदेला अवघे ५०० बंधारे बांधणे शक्य झाले असून, आता अवघा एक महिना शिल्लक असल्याने त्यात टार्गेट पूर्ण होणे अशक्य दिसत आहे.
आता नद्यांच्या प्रवाहात बंधारा
जिल्ह्यात ठिकठिकाणी १५ डिसेंबरपर्यंत ओढे, नाले, ओहळांचे वाहते पाणी मिळण्याच्या अपेक्षेने ग्रामपंचायत यंत्रणेसह गावकरी बंधारे बांधण्याच्या ठिकाणांचा शोध घेत आहेत. त्यात फारसे यश येत
नसल्याचे लक्षात आल्यामुळे आता त्यांनी नदीच्या प्रवाहात वनराई बंधारे बांधण्याच्या ठिकाणाचा शोध सुरू केला.