पालघरपाठोपाठ कोकण जिंकू या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 01:36 AM2018-06-09T01:36:14+5:302018-06-09T01:36:14+5:30

ठाणे, कोकण एकेकाळी भाजपाचे गड होते. परंतु, भाजपाने मैत्री जपण्याकरिता मित्रपक्षाला एकेक गड सोडले आणि भाजपा दुसऱ्या क्रमांकावर आला. परंतु, भाजपाला पुन्हा संधी मिळाली, तेव्हा आपण येथील जनतेचा विश्वास जिंकला.

To win Konkan after Palghar - Chief Minister Devendra Fadnavis | पालघरपाठोपाठ कोकण जिंकू या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पालघरपाठोपाठ कोकण जिंकू या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

googlenewsNext

ठाणे : ठाणे, कोकण एकेकाळी भाजपाचे गड होते. परंतु, भाजपाने मैत्री जपण्याकरिता मित्रपक्षाला एकेक गड सोडले आणि भाजपा दुसऱ्या क्रमांकावर आला. परंतु, भाजपाला पुन्हा संधी मिळाली, तेव्हा आपण येथील जनतेचा विश्वास जिंकला. काही दिवसांपूर्वी भाजपाने पालघर जिंकले. आता पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या माध्यमातून कोकण जिंकायचे आहे, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. फडणवीसांनी थेट शिवसेनेचा उल्लेख केला नसला, तरी त्यांच्या टीकेचा रोख त्याच पक्षाकडे होता.
भाजपाचे कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ भाजपा पदाधिकाºयांची खासगी बैठक टीपटॉप प्लाझामध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी खासदार, आमदार, नगरसेवक तसेच पदाधिकाºयांना निवडणूक जिंकण्याबाबत कानमंत्र दिला. फडणवीस म्हणाले, पालघर निवडणुकीच्या वेळेस आपण गाफील राहिल्याने आपल्या मित्रपक्षाने आपलाच उमेदवार पळवला. त्यामुळे त्यांनी आपल्यासमोर मोठे आव्हान निर्माण केले होते. आपल्याला प्रचाराकरिता जेमतेम १० दिवस मिळाले. परंतु, कार्यकर्ते जोमाने कामाला लागल्याने ही लढाई जिंकून दाखवली. आता या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला कोकणातील गतवैभव पुन्हा प्राप्त करायचे आहे. मागील वेळी निरंजन यांनी योग्य रचना आखल्याने ते निवडून आले. आता तेच आपल्या पक्षात आल्याने आपल्याला विजय प्राप्त करण्याची संधी मिळाली आहे.
मित्रपक्षाला आपण लोकसभा, विधानसभा दिली. परंतु, भाजपाला संधी मिळाली, तेव्हा आपली ताकद सिद्ध केली, असे नमूद करून फडणवीस म्हणाले, कल्याण, मीरा-भार्इंदर, उल्हासनगर आदी ठिकाणी भाजपाने कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि मतदारांनी दाखवलेल्या विश्वासावर चांगले यश मिळवले. पनवेलमध्ये युती करून निवडणूक लढण्याचे जाहीर झाले. परंतु, ऐन वेळेस पुन्हा मित्राने युतीस नकार दिला. तेथे मोठ्या हिमतीने लढलो आणि एकतर्फी विजय खेचून आणला. शिवसेनेला या ठिकाणी एकही जागा जिंकता आली नाही. भाजपाचा ११ पोटनिवडणुकांमधील पराभव विरोधकांना दिसतो. परंतु, २१ राज्ये काबीज केली, हे त्यांना दिसत नाही का, असा सवाल त्यांनी केला. स्वातंत्र्यानंतर इतकीराज्ये जिंकणारा भाजपा हा एकमेव पक्ष असल्याचेही फडणवीसांनी सांगितले. कर्नाटकमध्ये टीका झाली, परंतु मोदींनी आठ दिवस प्रचार केला आणि चित्र पालटले. २१ मतदारसंघांत नोटापेक्षा कमी मतांनी भाजपाच्या उमेदवारांनी मात खाल्ली. काँग्रेसने या ठिकाणी ६० हजारांचे बोगस मतदान केले. परंतु, आम्ही त्याबद्दल काही बोललो नाही. मोदींबाबत लोकांच्या मनात आदर आहे, हा देश मोदीच बदलू शकतात, असा लोकांच्या मनात विश्वास आहे.
काँग्रेसने सत्तेचा वापर स्वत:च्या परिवर्तनासाठी केला. आपल्याला जनतेच्या परिवर्तनासाठी करायचा आहे. मागील साडेतीन वर्षांत सर्व निवडणुकांमध्ये भाजपा प्रथम क्रमांकाचा पक्ष राहिला आहे. आपण यशस्वी वाटचाल करीत आहोत, असे ते म्हणाले.
कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक फार वेगळी आहे. येथे जमिनीवर राहून काम करावे लागणार आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. येथे सुईप्रमाणे मतदार शोधावा लागतो, असे फडणवीस यांनी सांगितले.
एकेकाळी मुंबईत स.का. पाटील यांना हरवणे कठीण होते, परंतु जॉर्ज फर्नांडिस यांनी तो करिष्मा केला होता. आता तसाच करिष्मा करून दाखवायचा आहे. या निवडणुकीत प्रचाराकरिता कार्यकर्त्यांनी वेळ देणे गरजेचे आहे. मेहनत घ्यावी लागणार आहे. १० मतदारांमागे एक कार्यकर्ता अशी रचना करावी लागेल. पालघरची निवडणूक जिंकल्यामुळे गाफील राहू नका. तुमच्या मनात जी खदखद आहे, ती या निवडणुकीतून बाहेर पडू द्या, असे सांगत फडणवीस यांनी अप्रत्यक्षरीत्या शिवसेनेविरोधात दोन हात करण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला. कोकण पदवीधरमध्ये आपल्याला केवळ विजय मिळवायचा नसून एकूण मतदानापैकी ६० टक्के मते घेऊन विजय संपादित करायचा असल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.
..........................
नेहमी आक्रमक शैलीत भाषण करणाºया मुख्यमंत्र्यांनी अत्यंत शांतपणे आपले विचार मांडले. ही बैठक पत्रकारांना खुली नव्हती.
....................


शिवसैनिक आत कसे?
भाजपाच्या या खासगी बैठकीत मागच्या दाराने काही शिवसैनिक उपस्थित असल्याचे समजते. मुख्यमंत्री काय टीका करतात, निवडणूक जिंकण्याबाबत कोणता मंत्र देतात, हे जाणून घेण्याकरिता ते आले होते. त्यामुळे पत्रकारांना बाहेर ठेवून भाजपाने काय साधले, असा प्रश्न उपस्थित झाला.

Web Title: To win Konkan after Palghar - Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.