मीरा-भाईंदर शहरातील भाजपमध्ये असंतोषाचे वारे; भ्रष्ट प्रवृत्तींना पक्षातून काढण्याची केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 11:38 PM2019-11-01T23:38:43+5:302019-11-01T23:39:25+5:30
सहप्रवक्ते संजय तिवारी यांनी दिला राजीनामा
मीरा रोड : मीरा- भाईंदर भाजपमध्ये निष्ठावंतांना स्थान नाही. जे पैसे आणि टेंडरसाठी काम करतात अशांचा हा पक्ष झाल्याची टीका करत भाजपचे जिल्हा सहप्रवक्ते संजय तिवारी यांनी आपले पद व पक्षाचा राजीनामा दिला. तर, भाजपला व्यक्ती व कंपनीच्या हितासाठी राबवले जात आहे. अशा व्यक्तींची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. सुरेश येवले यांनी केली आहे.
मीरा-भाईंदरमधील भाजपची सूत्रे नरेंद्र मेहतांच्या हाती सोपवल्या पासून अनेक ज्येष्ठ व निष्ठावंतांनी विरोध चालवला होता. पण नंतर काहींनी जुळवून घेतले तर काहींनी आपली भूमिका कायम ठेवली. मोदी लाटेत येथील राजकीय समीकरणे बदलल्याने २०१४ मध्ये मेहता आमदार झाले. त्यानंतर अन्य पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी भाजपमध्ये आल्याने २०१७ मध्ये महापालिकेत भाजपचे ६१ नगरसेवक निवडून आले. परंतु पालिकेतील सत्ता ही मेहता व त्यांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीच्या फायद्यासाठी राबवली जात असल्याची टीका, भ्रष्टाचार-गुंडगिरी, तसेच मनमानी कारभाराविरोधातील संताप, पक्षाची वाढती बदनामी आदी कारणांनी पक्ष व मेहता नेहमीच वादग्रस्त राहिले. विधानसभा निवडणुकीतही मेहतांचा दारूण पराभव भाजपाच्याच बंडखोर गीता जैन यांनी केला.
या पराभवानंतर तिवारी यांनी पद आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षात १९ वर्षे प्रामाणिकपणे मेहनत केली त्याचा पश्चाताप होत आहे. भाजपत चमचे खूप झाले आहेत. त्यामुळे निष्ठावंतांची कदर नाही. जे पैसे आणि टेंडरसाठी काम करतात अशा लोकांचा भाजप पक्ष झाला आहे. भाजप पहिल्या सारखा पक्ष राहिलेला नाही. जुन्या लोकांना मान नाही आणि नवीन लोकांना जबाबदारी दिल्याने पराभव झाला, अशी टीका तिवारी यांनी केली आहे.
भाजपचे महाराष्ट्र प्रदेश मागासवर्गीय मोर्चाचे विषेश निमंत्रित सदस्य तथा ज्येष्ठ कार्यकर्ते असलेले डॉ. सुरेश येवले यांनीही मीरा- भार्इंदर भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रेंसह पराभूत आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता आदींना जबाबदार धरले आहे. शहरात भाजपला मेहता व त्यांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीसाठी राबवले गेले. त्यांच्या हिताचे निर्णय महापालिकेत घेतले गेले. चुकीच्या लोकांच्या हाती पक्ष दिल्याने शहरात भ्रष्टाचार, गुंडगिरी, दडपशाही वाढून पक्षाची आणि पक्ष नेतृत्वाची प्रतिमा मलीन झाली. यातूनच लोकांमध्ये असंतोष खदखदत होता. त्यामुळे आमदार व महापौरांसह ६१ नगरसेवक, संघटना, पैसा असूनही नागरिकांनी भाजप उमेदवाराला पराभवाची धूळ चारली, असे डॉ. येवले म्हणाले.
डॉ. येवले भाजपमध्ये आहेत? : डॉ. येवले भाजपमध्ये आहेत? असा सवाल भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी केला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकी वेळी येवले, अच्छे दिन कुठे आले विचारत मोदींच्या विरोधात बोलत होते. त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. तेच स्वत:ला भाजपचे जुने कार्यकर्ते समजतात.तिवारी यांचा राजीनामा अजून माझ्याकडे आलेला नाही. मी स्वत: तिवारींशी बोलणार आहे, असे म्हात्रे म्हणाले.