रिक्षात गारेगार वारा, टीव्ही आणि बरेच काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 04:07 AM2018-08-29T04:07:58+5:302018-08-29T04:08:38+5:30
भार्इंदरमधील प्रवासी बेहद खूश : शालेय विद्यार्थी, दिव्यांगांसाठी विनामूल्य प्रवासाची सुविधा
राजू काळे
भार्इंदर : येथील मुर्धा गावात राहणाऱ्या एका रिक्षाचालकाने प्रवाशांसाठी अनेक सुविधा दिल्याने सध्या ते बेहद खूश आहेत. त्याच्या रिक्षात बसण्याचा छंदच जडला आहे. रिक्षात दोन एअर कूलर बसविले असून प्रवाशांना टीव्हीसह वायफाय तसेच शालेय विद्यार्थी व दिव्यांगांना विनामूल्य सेवा देण्याचा वसा रिक्षाचालक रोशन मयेकर याने घेतला आहे.
रोशन भार्इंदर पश्चिमेच्या मुर्धा गावात अनेक वर्षांपासून आपल्या कुटुंबासोबत राहतो. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी त्याने दोन वर्षापूर्वी खाजगी नोकरी पत्करली. मात्र नोकरीत मन रमत नव्हते. त्याने स्वत:ची रिक्षा खरेदी केली.
शालेय जीवनात त्याला व इतर विद्यार्थ्यांना वेळेत शाळेत पोहचण्यासाठी करावी लागणारी धडपड सतत त्याच्या मनात घर करू लागल्याने त्याने शालेय विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत विनामूल्य प्रवास घडवून देण्यास सुरूवात केली. दिव्यांगांना करावी लागणारी पायपीट त्याला सहन होत नव्हती. त्याने थेट दिव्यांगांसाठी विनामूल्य सेवा देण्यास सुरूवात केली. याखेरीज त्याने आपल्या रिक्षाकडे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी इतर चालकांप्रमाणे रोषणाई केली. पण त्याहूनही वेगळेपण निर्माण करण्यासाठी त्याने प्रवाशांना गरम हवामानाचा त्रास होऊ नये, यासाठी रिक्षाच्या छताखाली चक्क दोन एअर कूलर बसविले. तसेच प्रवाशांना इंटरनेटचे नेटवर्क उपलब्ध व्हावे, यासाठी मोफत वायफायची सेवा सुरू केली. प्रवाशांच्या करमणुकीसाठी रिक्षाच्या पुढील बाजूस एक छोटा टीव्ही स्क्रीन बसवला आहे. या सुविधांमुळे रोशन प्रवाशांच्या पसंतीस उतरला असून त्यांना त्याच्या रिक्षातून प्रवास करण्याचा जणू छंदच जडला आहे.
पाच ते सहा वेळा शिर्डीचा प्रवास
च्या छंदापायी काही प्रवाशांनी त्याला शिर्डीला जाण्यासाठी भाड्याची आॅफर देण्यास सुरूवात केली आहे. वर्षातून पाच ते सहा वेळा तो शिर्डी व इतर लांबच्या ठिकाणी प्रवाशांना घेऊन जातो.
च्या विशेष सेवांमुळे काही प्रवासी त्याच्या रिक्षाखेरीज इतर रिक्षातून प्रवास करीत नसल्याचे रोशनने सांगितले. अशा या आगळ्यावेगळ्या रिक्षाचालकाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.