मुंब्य्रात प्रथमच हिवाळी मॅरेथॉन स्पर्धा !
By admin | Published: January 7, 2016 12:38 AM2016-01-07T00:38:26+5:302016-01-07T00:38:26+5:30
पोलिसांच्या पुढाकाराने मुंब्य्रात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या हिवाळी मॅरेथोन स्पर्धेतील ६ किलोमीटरचे अंतर पार करून आतिफ इफ्तेखार मोहमद
मुंब्रा : पोलिसांच्या पुढाकाराने मुंब्य्रात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या हिवाळी मॅरेथोन स्पर्धेतील ६ किलोमीटरचे अंतर पार करून आतिफ इफ्तेखार मोहमद या विद्यार्थ्यांने,तर श्रद्धा पांडे या विद्यार्थिनीने विरल अंतर ३५ मिनिटे १२ सेकंदात पार करून स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. सहा,चार आणि दोन किलोमीटर अशा तीन गटांत विभागलेल्या या स्पर्धेतील १८ विजेत्यांना पोलीस आयुक्त परमवीर सिंह, पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार सुभाष भोईर आदीच्या हस्ते रोख पारितोषिके, प्रशस्तिपत्रके, आणि स्मृतिचिन्हे देण्यात आली.
येथील विद्यार्थ्यांमधील विविध प्रकारचे सुप्त क्रीडा गुण विकसित व्हावेत, त्याच्यातून उदयोन्मुख खेळाडू निर्माण व्हावेत, तसेच इतर शहरातील नागरिकांचा मुंब्य्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, या प्रमुख हेतूने पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्या निर्देशानुसार ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
मुंब्रा-दिव्यातील ५१ शाळा आणि ५ मदरशांमधील २ हजार १४२ विद्यार्थी आणि १ हजार २२६ विद्यार्थिनी असे एकूण तीन हजार ३६८ स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते. स्पर्धा व्हावी , यासाठी येथील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, डॉक्टर्स, शाळांचे शिक्षक, लोकप्रतिनिधी, वाहतूक पोलीस आदींनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांनी मोलाचे सहकार्य केले. वरील सर्वाच्या सहकार्यामुळे स्पर्धा यशस्वी झाल्याचे प्रतिपादन तायडे यांनी त्यांच्या भाषणात केले.
या स्पर्धेत सहभागी होता आले नाही, याची खंत वाटत असल्याचे आयुक्त सिंह त्यांच्या भाषणात म्हणाले. स्वर्गीय माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्याबरोबर काम केलेले सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायन यांनी मुंब्य्राला जागतिक पातळीवर नेण्यासाठी तसेच कलाम यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी या भागातील विद्यार्थ्यांनीही पुढे यावे, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाषणात दिली. मुंब्य्रामध्ये विविध प्रकारचे टॅलेंट असलेले तरु ण वास्तव्य करीत आहेत, त्यांना पुढे आणण्यासाठी, रस्ता हरवलेल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे प्रतिपादन उपायुक्त सचिन पाटील यांनी त्यांच्या भाषणात केले.
या स्पर्धेत सहभागी झालेल्यांनी आयुष्याच्या स्पर्धेतही यशस्वी व्हावे, असे प्रतिपादन अप्पर पोलीस आयुक्त प्रतापसिंह पाटणकर यांनी शायरीमधून व्यक्त केले. येथील नागरिकांमध्ये बंधुभाव वाढविणारी ही स्पर्धा होती. असे, पालकमंत्री शिंदे त्यांच्या भाषणात म्हणाले.
या स्पर्धेमुळे परिसरातील नागरिकांची मने जुळली, तसेच या स्पर्धेने इतिहास घडवल्याचे आमदार भोईर म्हणाले.