‘विचारे’ मना का अफवा सोडूनि आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 03:20 AM2017-08-15T03:20:18+5:302017-08-15T03:20:22+5:30
ठाण्यासाठी २१ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेले पासपोर्ट कार्यालय बंद करून येत्या २१ आॅगस्टपासून ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे स्थलांतरित होणार
ठाणे : ठाण्यासाठी २१ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेले पासपोर्ट कार्यालय बंद करून येत्या २१ आॅगस्टपासून ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे स्थलांतरित होणार, अशी अफवा खासदार राजन विचारे यांनी परराष्ट्र मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रामुळे पसरली. वस्तुत: पासपोर्ट सेवा देण्याचे कार्यालय ठाण्यातच सुरू राहणार आहे. केवळ प्रशासकीय कार्यालय बीकेसीत हलवण्यात येणार आहे. ऐकीव माहितीच्या आधारे विचारे यांनी हे पत्र लिहिल्याचे उघड झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पूर्वी केवळ ठाणे जिल्ह्यापुरते मर्यादित असलेल्या पासपोर्ट कार्यालयाशी ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव असे ८ जिल्हे जोडले गेले. दिवसाला सुमारे दोन हजारांहून अधिक पासपोर्टचे वितरण ठाणे कार्यालयाकडून केले जाते. वर्षाला साडेतीन लाखांपेक्षा अधिक पासपोर्ट अर्ज स्वीकारले जातात. आता ठाणे येथील कार्यालय बंद करून मुंबई पासपोर्ट कार्यालयांतर्गत जोडण्याचा निर्णय परराष्ट्र मंत्रालयाने घेतला आहे, असे पत्र विचारे यांनी सर्व कार्यालयांना पाठवून दिल्याने धक्काच बसला.
बीकेसीमधील विदेश भवन या नवीन इमारतीत २१ आॅगस्टपासून ठाणे पासपोर्ट कार्यालय स्थलांतरित करण्यात येणार आहे. यामुळे ठाण्यातील नागरिकांना आता पासपोर्टसंदर्भात काहीही कामासाठी ३० किमी दूर बीकेसीला जावे लागेल, असा दावा विचारे यांनी केला.
दरम्यान, यासंदर्भात ठाणे पासपोर्ट कार्यालयातील एका उच्चपदस्थ अधिकाºयाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पासपोर्ट कार्यालय बंद होणार नाही. परंतु, कार्यालयीन कामकाज मुंबईला जाणार आहे. ठाण्यासह अन्य आठ जिल्ह्यांतून येणाºया नागरिकांना याच कार्यालयाच्या माध्यमातून पासपोर्ट वितरित होणार आहेत. परंतु, ज्यांच्यावर ‘पासपोर्ट अॅक्ट’ लागू होत असेल, म्हणजेच गुन्हेविषयक काही प्रकरणे असतील. अर्जात काही त्रुटी असतील तर त्यांना मात्र मुंबईत जावे लागणार आहे. हे प्रमाण दिवसाकाठी ३० ते ४० एवढेच आहे. शिवाय, डोंबिवली आणि नवी मुंबई येथेदेखील पासपोर्ट कार्यालयाचे सबडिव्हीजन सुरू होणार आहे.
मुंबईत हे कार्यालय गेल्यास सगळ्यांनाच त्याचा त्रास होणार असल्याचे विचारे यांनी नमूद केले. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना पत्र लिहून ठाणे पासपोर्ट कार्यालय सुरू ठेवा, अशी विनंती केल्याचे विचारे यांनी स्पष्ट केले.