डोंबिवलीत रस्त्यालगत जादूटोण्याचे साहित्य; कडक कारवाईची अंनिसची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 11:54 PM2019-06-04T23:54:37+5:302019-06-04T23:54:44+5:30
टाचण्या टोचलेली काळी बाहुली, टाचणी टोचलेले लिंबू, नारळ, कोहळा, अबीर, बुक्का, गुलाल यासारखे करणी उतरवण्याचे काळ्या जादूचे साहित्य रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आल्याचे आढळून आले
डोंबिवली : अंधश्रद्धेपोटी येथील निवासी विभागातील वर्दळीच्या चार रस्त्यावर एका व्यक्तीने ठेवलेल्या करणी उतरवण्याच्या सामानाच्या टोपलीने पादचाऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. डोंबिवलीसारख्या सुसंस्कृत आणि सुशिक्षितांच्या नगरीत जादूटोण्याच्या प्रकारांबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे. निवासी विभागातील सर्व्हीस रोडला असलेल्या एका चौकात बांबूच्या टोपलीत काळ््या कापडावर चौफेर हळद-कुंकू लावलेली अंडी, टाचण्या टोचलेली काळी बाहुली, टाचणी टोचलेले लिंबू, नारळ, कोहळा, अबीर, बुक्का, गुलाल यासारखे करणी उतरवण्याचे काळ्या जादूचे साहित्य रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आल्याचे आढळून आले. ही टोपली ठेवण्यात आली त्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांसाठीचे निवासस्थान असून त्याठिकाणी कुणाचेही वास्तव्य नसल्याने तेथील वास्तू पडीक अवस्थेत आहे.
जिल्ह्यातील बहुंताश ग्रामीण परिसरातील गाव-पाड्यातील वस्तीत आजही अंधश्रद्धा आहे. असाच प्रकार डोंबिवलीसारख्या सुसंस्कृत आणि सुशिक्षितांच्या नगरीत आढळून आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे दिवसभर या प्रकाराचीच चर्चा रंगली होती.
अशाप्रकारे अंधश्रद्धेच्या माध्यमातून देवभोळ्या भक्तांना घाबरवण्याच्या दृष्टीने करणी केलेला उतारा भर रस्त्यात टाकण्यात आल्याचा प्रकार निंदनीय आहे. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या डोंबिवली शाखेच्या वतीने मानपाडा पोलिसांना एक निवेदन देऊन असे कृत्य करणाºयावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणार आहोत. — अॅड. तृप्ती पाटील, राज्य सहकार्यवाह, महा. अंनिस कायदा विभाग