स्वत:च्या पैशाने डॉ. आंबेडकरांनी शिक्षण संस्था उभारल्या - आव्हाड
By सुरेश लोखंडे | Published: December 11, 2022 08:14 PM2022-12-11T20:14:07+5:302022-12-11T20:14:07+5:30
स्वत:च्या पैशाने डॉ. आंबेडकरांनी शिक्षण संस्था उभारल्या असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.
ठाणे : या प्रस्थापितांनी आम्हाला कधी शिक्षणच घेऊ दिले नव्हते. तरीही फुले-आंबेडकर-कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आम्हा बहुजनांना शिक्षण दिले. महात्मा फुले हे त्याकाळी आजच्या टाटांपेक्षा श्रीमंत होते. त्यांनी स्वपैशाने शाळा सुरु केल्या. रयत शिक्षण संस्थेचे जाळे विणताना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गावोगावी फिरुन लोकवर्गणीतून संस्था उभ्या केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वत:च्या पैशांनी शिक्षण संस्था उभ्या केल्या. त्यासाठी त्यांनी पत्नीचे दागिने, सोने विकले. त्यांनी कोणाकडूनही लोकवर्गणी घेतली नसल्याचे स्पष्ट करून उच्चतंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्त व्याचा समाचार राष्टवादीचे नेते, माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येथील एन केटी सभाग१हात शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबीर घेतले. या शिबिराच्या समारोप प्रसंगी आव्हाड बोलत होते. रयत शिक्षण संस्था आणि बाबासाहेबांच्या शिक्षण संस्थेनेच गोरगरीबांची, बहुजनांची मुले सर्वाधिक सुशिक्षित केली, हेच या लोकांना सहन होत नाही. आता एमपीएससीच्या अभ्यासक्रमातून महाराष्ट्राचा इतिहास वगळण्यात आला आहे. त्यामागे कारण हेच आहे की फुले-आंबेडकरांचा इतिहास नव्या सनदी अधिकाºयांना कळला तर त्यांच्या मनात गोरगरीबांविषयी कळवळा व सहानुभूती निर्माण होते. तीच या लोकांना नको आहे. बहुजनांना मूळ प्रवाहातून बाजूला करण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट करून सावध राहण्याचे मार्गदर्शन आव्हाड यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.
या आधी महाराष्ट्रात जे कधी घडले नव्हते; ते आता घडत आहे. एखाद्यावरचा राग काढण्यासाठी त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहे. आधी शिक्षा सुनावली जात आहे. दबाव आला की गुन्हा दाखल केला जात आहे; नंतर चौकशी केली जात आहे. पण, अटकेला घाबरुन कोणाच्या पायाशी लोळण घेणे आपणाला जमणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आपण लढण्यासाठी सज्ज आहोत. कार्यकर्त्यांनी लढण्यासाठी सज्ज रहावे, असेही आव्हाड यांनी स्पष्ट करून त्यांच्यासाठी या आधी कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या एकजुटी पुढे ते नतमस्तकही झाले. या नवीन सरकारला जोपर्यंत अनुकूल वातावरण वाटत नाही, तोपर्यंत निवडणुका होण्याची शक्यता कमीच आहे. पण या नवीन सरकारला कधीच अनुकूल वातावरण होणार नसल्याचेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
निवडणुका जिंकून देण्याची क्षमता असलेल्या कल्याणजवळील आपल्या एका कार्यकर्त्याला आणि त्याच्या भावांना मोक्का लावून चक्क तुरुंगात डांबण्यात आल्याचे आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. पण, ध्यानात ठेवा आंदोलनाशिवाय कार्यकर्ता जिवंतच राहू शकत नाही. त्यामुळे आता कार्यकर्त्यांना घाबरविणे आणि फसविण्याचे प्रकार सुरु होतील. त्यांच्या या जाळ्यात अडकू नका. या विरोधात आपणाला लढायचे आहे. त्यांच्याकडे पैसा खूप आहे पण, आपल्यासारखे निष्ठावान कार्यकर्ते नसल्याचेही आव्हाड यांनी कार्यकर्त्यांच्या लक्षात आणून दिले. या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराला जन आंदोलनाच्या समन्वय समितीचे राष्ट्रीय समन्वयक संजय मंगो, ज्ञानेश्वर दराडे,पत्रकार अनिल ठाणेकर, मुफ्ती अशरफ,मोहसिन शेख आदींनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महिलांचा समावेशही मोठ्याप्रमाणात होता.