मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने ठाणे आपत्ती प्रतिसाद पथकात लवकरच ७९ पदांची भरती, जिल्ह्यातील बेरोजगारांना दिलासा
By सुरेश लोखंडे | Published: October 7, 2022 06:57 PM2022-10-07T18:57:10+5:302022-10-07T18:57:40+5:30
मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने ठाणे आपत्ती प्रतिसाद पथकात लवकरच ७९ पदांची भरती करण्यात येणार आहे.
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद पथकात ७९ पदे निर्माण करण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. वाढते नागरीकरण, नैसर्गिक आपत्ती यामुळे एनडीआरएफच्या धर्तीवर हे ‘प्रतिसाद दल’ कार्यान्वित करण्यात आले. यासाठी महापालिकेला साडेचार कोटींचा खर्च येणार आहे. शहराची गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी ठाणे महापालिकेला ही मान्यता दिल्यामुळे ही पदे लवकरच भरण्यात येणार असल्यामुळे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना दिलासा मिळाला आहे.
ठाणे महानगरपालिकेने शहरासाठी आवश्यक असलेले आपत्ती प्रतिसाद पथक निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्याना प्रस्ताव दिला होता. त्यात वर्ग-२ व वर्ग-३ मध्ये ७९ पदे निर्माण करण्याचा प्रस्तावही नमुद करण्यात आला होता. ठाणेकरांची ही गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी या पदनिर्मितीला मान्यता दिली. या पदसंख्येमुळे नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने सुशिक्षित बेरोजगार तरूणांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर शासनाने ८८० पदे निर्माण करण्यास मंजूरी दिली होती. त्यामध्ये मुख्यत: आरोग्य विभागातील पदे होती, मात्र आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद पथकातील पदांचा समावेश नव्हता. त्याकडे लक्ष केंद्रीत करून आता आपत्ती प्रतिसाद पथकामध्ये वर्ग दोनचे एक पद कमांडंट तसेच वर्ग तीनची डेप्युटी कमांडंटची तीन पदे आणि प्रतिसादकांची (रिस्पॉडंर) ७५ पदे आदी मिळून ७९ पदे निर्माण केली जातील.यासाठी महानगरपालिकेला ४.६४ कोटी रूपये खर्च येणार आहे.