१० इलेक्ट्रिक बस आल्याने मीरा भाईंदर महापालिकेने सुरु केले ५ नवीन बस मार्ग
By धीरज परब | Published: March 15, 2024 06:53 PM2024-03-15T18:53:01+5:302024-03-15T18:53:18+5:30
मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन उपक्रमात आधीच्या ७४ होत्या केंद्र शासना कडून पालिकेला ५७ इलेक्ट्रिक बस मंजूर झाल्या आहेत.
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात नवीन १० इलेक्ट्रिक बस दाखल झाल्याने पालिकेने शहरात नवीन ५ बस मार्ग प्रायोगिक तत्वावर सुरु केले आहेत.
मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन उपक्रमात आधीच्या ७४ होत्या केंद्र शासना कडून पालिकेला ५७ इलेक्ट्रिक बस मंजूर झाल्या आहेत. त्यातील १० इलेक्ट्रिक बस ह्या आधीच विविध बसमार्गांवर प्रवाश्यांच्या सेवेत सक्रिय आहेत . तर नव्याने आणखी १० इलेक्ट्रिक बस पालिकेला मिळाल्या आहेत.
नवीन १० बस आल्याने नवीन बस मार्ग सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण अनेक बस मार्ग प्रवाश्यांच्या गरजेचे असताना देखील बस च्या कमतरतेमुळे ते सुरु करता येत नव्हते. आयुक्त संजय काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली १४ मार्च पासून १० नवीन इलेक्ट्रिक बस ह्या ५ नवीन बस मार्गांवर सुरु करण्यात आल्या आहेत.
बसमार्ग क्र. ५ हा भाईंदर रेल्वे स्थानक पश्चिम येथून काशिमिरा नाका असा सध्या भाईंदर पोलीस ठाणे मार्गे जाणार आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर बस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ६० फूट मार्ग, मॅक्सेस मॉल मार्गे जाईल. बसमार्ग क्र. २० हा भाईंदर रेल्वे स्थानक पश्चिम येथून मॅक्सेस मॉल मार्गे मोर्वा भाट पर्यंत सुरु केला आहे.
बसमार्ग क्र. २५ हा मीरारोड स्थानक पूर्व ते सृष्टी, शांतीगार्डन, मिरागाव, प्लेझंट पार्क मार्गे काशिमीरा नाका असा सुरु केला आहे. बसमार्ग क्र. २८ हा मीरारोड स्थानक पूर्व ते नयानगर, दिपक हॉस्पिटल, स्व. हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे मैदान, इंद्रलोक पोलीस चौकी मार्गे भाईंदर रेल्वे स्थानक पूर्व असा सुरु झाला आहे. तसेच यापूर्वी सुरू केलेल्या बसमार्ग क्र.२३ हा भाईंदर पूर्व स्थानक ते पेणकरपाडा पर्यंत होता. हा बसमार्ग पेणकरपाडा वरून पूढे बोरीवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानपर्यंत विस्तारीत करण्यात आला आहे.
नव्याने सुरू करण्यात आलेल्या ह्या बस मार्गांमुळे महापालिकेची परिवहन सेवा आता २४ मार्गांवर धावत आहे. शहरातील नागरिकांना ह्या नवीन बस मार्गां मुळे भाईंदर रेल्वे स्थानक पश्चिम व पूर्व , मीरारोड रेल्वे स्थानक काशिमीरा, दहिसर मेट्रो स्टेशन, बोरीवली - संजय गांधी राष्ट्रीय उद्यान इत्यादी ठिकाणी जाणे - येण्यासाठी फायदा होणार आहे. सध्या परिवहन सेवेच्या बसचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रतिदिन ९७ हजार पर्यंत पोहचली आहे. प्रतिदिन सव्वा लाख प्रवासी टप्पा गाठण्याचा पालिकेचा मानस असल्याचे आयुक्त संजय काटकर यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे नवीन १२ मीटर वातानुकूलित इलेक्ट्रिक बस आल्या नंतर मीरा - भाईंदर येथून मुंबई विमानतळ मार्गे वांद्रे (बीकेसी) पर्यंत बसमार्ग सुरु करण्याचे प्रस्तावित आहे असे आयुक्त म्हणाले.