९०० पोलिसांच्या मदतीने नाचनच्या आवळल्या मुसक्या; मध्यरात्रीपासूनच पडघा परिसराला पोलिस गाड्यांचा गराडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 06:51 AM2023-12-10T06:51:03+5:302023-12-10T06:52:28+5:30

पडघ्याजवळील बोरिवली गावात घराघरात शनिवारी पहाटे साडेतीनच्या  सुमारास सारे झोपले असताना अचानक एनआयए, महाराष्ट्र एटीएसची पथके गावात शिरली.

With the help of 900 policemen, Nachan arrested Police vehicles cordoned off Padgha area since midnight | ९०० पोलिसांच्या मदतीने नाचनच्या आवळल्या मुसक्या; मध्यरात्रीपासूनच पडघा परिसराला पोलिस गाड्यांचा गराडा

९०० पोलिसांच्या मदतीने नाचनच्या आवळल्या मुसक्या; मध्यरात्रीपासूनच पडघा परिसराला पोलिस गाड्यांचा गराडा

मेघनाथ विशे

पडघा : पडघ्याजवळील बोरिवली गावात घराघरात शनिवारी पहाटे साडेतीनच्या  सुमारास सारे झोपले असताना अचानक एनआयए, महाराष्ट्र एटीएसची पथके गावात शिरली. ३० ते ३५ घरांवर एनआयएने छापे टाकत साकिब नाचनसह १५ जणांना ताब्यात घेतले. २००३ मध्ये साकिबला अटक करायला दहशतवादविरोधी पथक गेले असताना त्यांच्यावर तुफान दगडफेक केली गेली होती. त्यामुळे शनिवारी पहाटे तब्बल ८००-९०० पोलिसांचा फौजफाटा घेऊन एनआयए पडघ्यात गेले होते.

मध्यरात्रीपासूनच पडघ्यात  पोलिसांच्या गाड्यांचा ताफा जमू लागला. ठाणे ग्रामीण पोलिस, राज्य राखीव पोलिस दल, रायगड पोलिस दलातील दंगल पथक, नियंत्रण कक्षातील  ज्यादा कुमकही पडघ्यात मागवण्यात आली होती.

पडघा गावाला छावणीचे स्वरूप आले होते. बोरिवली गावातील पंधरा जणांना ताब्यात घेतल्यावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने बोरिवली गावात जाणारे सर्वच रस्ते पोलिसांकडून सीलबंद करण्यात आले होते.

पहाटेपर्यंत पोलिस दबा धरून बसले होते. पहाटे तीन साडेतीनदरम्यान एकाच वेळेस पोलिसांनी बोरिवली गावातील संशयित घरांवर छापे टाकले. तब्बल तासभर पोलिस पथक या परिसरात कारवाई करीत होते. स्थानिकांनी पोलिसांच्या कारवाईत अडथळे आणण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

उपसरपंच फरहान सुसेही ताब्यात  

या प्रकरणात फरहान सुसे यासही एनआयएने ताब्यात घेतले. फरहान हा बोरिवली ग्रामपंचायतीचा उपसरपंच, तसेच साकिब  नाचनचा निकटवर्तीय समजला जातो. २०२१ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत यांच्या पॅनलने तेरापैकी दहा जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले होते. मात्र, सरपंचपद आरक्षित असल्याने सुसे याला सरपंचपदी विराजमान होता आले नाही.

Web Title: With the help of 900 policemen, Nachan arrested Police vehicles cordoned off Padgha area since midnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.