आ. गीता जैन विरोधातील तक्रार ठेक्याच्या कनिष्ठ अभियंतानी मागे घेतल्याने वादाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता
By धीरज परब | Published: June 27, 2023 08:07 PM2023-06-27T20:07:27+5:302023-06-27T20:07:37+5:30
तक्रार मागे घेतल्याचे पत्र दिल्यावर अभियंत्याने आई व मोठ्या भावासह आ. जैन यांची भेट घेऊन भावाच्या लगाची निमंत्रण पत्रिका दिली.
मीरारोड - मीरा भाईंदरच्या भाजपा समर्थक आमदार गीता जैन यांनी महापालिकेच्या ठेक्यावरील कनिष्ठ अभियंत्यास थप्पड लगावल्या प्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार मंगळवारी त्या अभियंत्यांनी मागे घेतली . तक्रार मागे घेतल्याचे पत्र दिल्यावर त्या अभियंत्याने आई व मोठ्या भावासह आ . जैन यांची भेट घेऊन त्यांना भावाच्या लगाची निमंत्रण पत्रिका दिली . दोन्ही बाजूने वाद मिटल्याचे सांगण्यात आल्याने गेल्या काही दिवसां पासून गाजत असलेल्या ह्या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे .
मीरारोडच्या पेणकरपाडा येथील राजीव सिंह कुटुंबियांचे राहते घर शासन आदेशचे उल्लंघन करून पावसाळ्यात बिल्डरच्या तक्रारी तोडल्याने आ . जैन ह्या २० जून रोजी पाहणीसाठी गेल्या होत्या . त्यावेळी ठेक्यावरील कनिष्ठ अभियंते शुभम पाटील व संजय सोनी हे उपस्थित होते . घर तोडण्या आधी महिला , लहान मुलांना बळजबरी बाहेर खेचून काढले आदी बाबी घरातील महिला आ . जैन यांना रडून सांगत होती . तर आ . जैन ह्या त्या अभियंत्यांची कानउघाडणी करत होत्या . त्यावेळी शुभम ह्याला हसू आले म्हणून आ . जैन यांनी त्याचे शर्ट धरून त्याला थप्पड लगावली . थप्पड मारल्याचा व्हिडीओ सुद्धा सर्वत्र व्हायरल झाला .
त्याच रात्री आ . जैन व पीडित महिलेने काशीमीरा पोलीस ठाण्यात शुभम व सोनी विरुद्ध तक्रार अर्ज दिला तर त्या दोघांनी आ . जैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तक्रार केली . मात्र त्या नंतर फिर्याद द्यायला कोणी आले नसल्याने पोलिसांनी तक्रार अर्जाची चौकशी चालवली होती . या घटने नंतर आ. जैन यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता , मनसे सह अनेकांनी मागणी केली . तर दुसरीकडे प्रशासनातील गैर व मनमानी कारभारा मुळे आ . जैन यांचे समर्थन सुद्धा केले जात होते .
मंगळवारी मात्र शुभम व सोनी यांनी काशीमीरा पोलीस ठाण्यात अर्ज देऊन २० जून रोजी केलेली तक्रार मागे घेत असल्याचे पत्र दिले . पत्र दिल्या नंतर शुभम हा त्याची आई व मोठ्या भावासह आ . जैन यांच्या कार्यालयात जाऊन भेटले . त्यावेळी मोठ्या भावाच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका आ . जैन याना त्यांनी दिली .
आ . जैन यांनी त्यावेळची घटना हि महिला म्हणून आलेल्या चिडीतून अचानक घडली असल्याचे सांगत होणाऱ्या कारवाईला सामोरे जाण्यास आपण तयार होतो . आपले ह्या दोन्ही अभियंत्यांशी कधीच वाद नव्हते असे सांगत त्यांनी शुभमच्या भावाच्या लग्नाचे निमंत्रण स्वीकारले . एका माजी नगरसेविकेच्या पतीने अभियंत्यांच्या वतीने आ . जैन यांच्या कडे मध्यस्थी करून हा वाद मिटवल्याचे सांगितले जाते .