पाच वर्षांतच गडगंज
By admin | Published: February 16, 2017 02:06 AM2017-02-16T02:06:53+5:302017-02-16T02:06:53+5:30
मागील पाच वर्षांत काही नगरसेवकांच्या मालमत्तेत तीन ते पाचपट अशी घसघशीत वाढ झाल्याचे त्यांच्याच प्रतिज्ञापत्रांतून स्पष्ट झाले आहे.
ठाणे : मागील पाच वर्षांत काही नगरसेवकांच्या मालमत्तेत तीन ते पाचपट अशी घसघशीत वाढ झाल्याचे त्यांच्याच प्रतिज्ञापत्रांतून स्पष्ट झाले आहे. मागील कित्येक वर्षे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेले-आता शिवसेनेत दाखल झालेले नाना ऊर्फ देवराम भोईर, नजीब मुल्ला आणि माजी महापौर एच.एस. पाटील यांच्यासह काही कोट्यधीश नगरसेवकांची नावे अग्रक्रमाने घ्यावी लागणार आहेत.
ज्येष्ठ नेते देवराम भोईर यांनी २०१६ मध्ये बाळकुम येथील ५१ अ या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरला, तेव्हा सात कोटींची मालमत्ता दाखवली होती. अवघ्या एक वर्षात ती १२ कोटी झाली आहे. माजी महापौर एच.एस. पाटील यांची २०१२ मध्ये ३ कोटी असलेली मालमत्ता आता २०१७ मध्ये १७ कोटी इतकी झाली आहे. अपक्ष म्हणून स्वतंत्रपणे उभे राहिलेले व बिल्डर परमार आत्महत्येप्रकरणात तुुरुंगवारी करून आलेले उमेदवार सुधाकर चव्हाण यांच्याही संपत्तीत पाच वर्षांमध्ये लक्षणीय वाढ होऊन ती ३६ कोटी म्हणजेच चारपट वाढली आहे. त्यांनी ठाणे शहर आणि परिसरात १३ कोटींची स्थावर मालमत्ता दाखवली असून त्यांच्या गाड्यांची किंमत २ कोटी आहे. तर, कुटुंबांकडील दागदागिने ७ लाखांचे आहेत. भाजपाचे नेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष संजय वाघुले यांच्या संपत्तीमध्येही लक्षणीय वाढ दिसून येते आहे. त्यांची पाच वर्षांपूर्वी ६७ लाखांची मालमत्ता आज जवळजवळ दुप्पट झालेली आहे. तर, हल्लीच भाजपामध्ये दाखल झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांची संपत्ती तब्बल ६.७४ कोटी इतकी झाली आहे. त्यांच्या गुंतवणुकीमध्ये मुरबाड येथील जमीन आणि दागदागिने आणि शहरातील काही व्यापारी जागांचा समावेश होतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व परमार आत्महत्येप्रकरणात तुुरुंगवारी करून आलेले दुसरे नगरसेवक नजीब मुल्ला यांच्याकडे काही जमिनी, व्यावसायिक जागा आणि घरे असून त्यांची संपत्ती २०१२ मध्ये रु पये ३ कोटी होती. आता २०१७ मध्ये थेट २३ कोटी इतकी झालेली आहे. टोनी रेसिडेन्सीमधील त्यांच्या आलिशान घराचीदेखील किंमत फारच वाढली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, मागील तीन वर्षांमध्ये घरांच्या किमतीत झालेल्या लक्षणीय वाढीमुळेच त्यांच्या संपत्तीचा आकडा फुगला आहे. (प्रतिनिधी)