अवघ्या तीन तासांमध्ये ठाणे पोलिसांनी घेतला रुग्णवाहिकेचा शोध
By जितेंद्र कालेकर | Published: September 23, 2019 10:40 PM2019-09-23T22:40:21+5:302019-09-23T22:43:48+5:30
एरव्ही, एखादी घटना घडल्यानंतर तिची तक्रार किंवा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस यंत्रणा कार्यान्वित होते. हे सर्वश्रुत आहे. पण, नौपाडा भागातून एक रुग्णवाहिका अचानक गायब झाली. तिची तक्रार दाखल होण्यापूर्वीच तिचा अवघ्या तीन तासांमध्ये शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे शहरातील नौपाडा भागातून शनिवारी अचानक चोरीस गेलेल्या दापोली (जि. रत्नागिरी) येथील एका रुग्णवाहिकेचा अवघ्या तीन तासांमध्ये शोध घेतला. आपली रुग्णवाहिका सुखरुप मिळाली. शिवाय, दापोली येथे तातडीने जायचे असल्यामुळे या रुग्णवाहिकेच्या चालकाने ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संदीप सुधाकर केळकर (४०, रा. बाजारपेठ, दापोली) हे २० सप्टेंबर रोजी दापोली येथे जात असताना त्यांची रु ग्णवाहिकेच्या इंजिनमध्ये अचानक आवाज आल्याने त्यांनी नौपाडा येथील गुरूद्वारासमोरील मुंबई अहमदाबाद पूर्व द्रूतगती मार्गावर रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास उभी केली. त्यानंतर कोपरी येथील एका हॉटेलमध्ये ते विश्रांतीसाठी निघून गेले. दुसऱ्या दिवशी २१ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास खोपोली येथील एका रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका उभी केलेल्या ठिकाणी गेले. मात्र, तिथे कुठेही रुग्णवाहिका आढळली नाही. त्यामुळे त्यांनी तातडीने नौपाडा पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती दिली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेउन त्यांनी यासाठी दोन पथके तयार केली. ठाणे शहराच्या बाहेर जाणा-या रस्त्यावर शोध घेतला असता, ही रुग्णवाहिका माजिवडा येथील मासळी बाजाराजवळ सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आढळून आली. ही रुग्णवाहिका तिथे कोणी आणि कशी नेली? याचा मात्र उलगडा झाला नसून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, दापोली येथे एका रुग्णालयात तातडीने जायचे असल्यामुळे केळकर यांनी याप्रकरणी कोणतीही तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली नाही. मात्र, अवघ्या तीन तासात रु ग्णवाहिकेचा शोध घेणा-या नौपाडा पोलिसांचे त्यांनी आभार मानले.