अनुदान देऊनही विद्यार्थी गणवेशाविना; सदस्यांनी प्रशासनाला धरले धारेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 01:18 AM2019-12-09T01:18:31+5:302019-12-09T01:18:35+5:30
सप्टेंबर महिन्यातच सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे अनुदान भिवंडी तालुक्याला वर्ग करण्यात आले असल्याची माहिती जि.प.चे प्राथमिक शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी दिली.
ठाणे : भिवंडी तालुक्यातील खोणी गटामधील उर्दू शाळेतील सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन सहा महिने उलटल्यानंतरही अद्यापही विद्यार्थी गणवेशाविना असल्याची बाब जिल्हा परिषद सदस्य अशोक घरत यांनी शनिवारी ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत निदर्शनास आणत, संबंधित शिक्षण विभागाला सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले होते. त्यावेळी येत्या दोन दिवसांत भिवंडी तालुक्यातील सर्व शाळांमध्ये अनुदान पोहोचवण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी दिली.
सर्वशिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पहिली ते आठवी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींसह अनुसूचित जातीजमातीच्या विद्यार्थ्यांनादेखील गणवेशाचे वाटप करण्यात येत असते. यासाठी या अभियानांतर्गत कोट्यवधी रु पयांचा निधी देण्यात येत असतो. मात्र, सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांनादेखील गणवेश मिळावा, यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून निधी उपलब्ध करून दिला होता.
दरम्यान, भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या खोणी गटाचे सदस्य अशोक घरत हे शाळेला भेट देण्यासाठी गेले असता, उर्दू शाळेतील सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश अद्यापही प्राप्त झाले नसल्याची बाब उघड झाली. त्यामुळे स्थायी समितीपाठोपाठ शनिवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेतदेखील घरत यांनी या मुद्याला हात घातला. या प्रकरणावरून सदस्यांनी शिक्षण विभागाला चांगलेच धारेवर धरले. यावेळी सप्टेंबर महिन्यातच सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे अनुदान भिवंडी तालुक्याला वर्ग करण्यात आले असल्याची माहिती जि.प.चे प्राथमिक शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी दिली. याबाबत चौकशी केली असता, तालुक्याला अनुदान प्राप्त झाल्याचा अहवाल प्राप्त झाला असून येत्या दोन दिवसांत शाळांना अनुदान वितरित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.