थर्ड पार्टी ऑडिटशिवाय ठेकेदारांना पेमेंट नाही; आयुक्तांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:47 AM2019-09-24T00:47:46+5:302019-09-24T00:47:53+5:30
‘जेव्ही’ची अट विशेष कामांसाठीच
ठाणे : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ५ (२) (२) अंतर्गत केलेल्या विविध कामांचे त्रयस्थ पक्षाकडून ऑडिट झाल्याशिवाय ठेकेदारांना देयक अदा करू नये, असे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांना दिले. तसेच यापुढे सरसकट जेव्ही (जॉइंट व्हेंचर) ही अट न वापरता केवळ विशेष कामांसाठीच ती वापरावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने जी विविध कामे करण्यात आली आहेत, ती मूळ अंदाजपत्रकाप्रमाणे आणि मंजूर आराखड्यानुसार केली आहेत की नाही, याची त्रयस्थ पक्षाकडून पडताळणी करूनच देयके अदा करावीत, असे त्यांनी सोमवारी सकाळी महापालिका मुख्यालयात आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले. मागील काही महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या कामांबाबत आक्षेप घेण्यात आले होते. रस्त्यांच्या कामांवरून तर या विभागाची चांगलीच कानउघाडणी महासभेत आणि स्थायी समितीच्या बैठकीतही करण्यात आली आहे. तसेच काही सामाजिक संस्थांनीही शहरातील यूटीडब्ल्यूटीच्या रस्त्यांबाबत शंका उपस्थित केल्या होत्या. शिवाय, शहरात झालेल्या रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामांवरूनही आयुक्त संतापलेले होते. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
जॉइंट व्हेंचरच्या कामांवर मर्यादा
दुसरीकडे जेव्ही (जॉइंट व्हेंचर) अंतर्गत करण्यात आलेल्या कामाचा दर्जा आणि त्याअनुषंगाने प्राप्त झालेल्या तक्र ारीच्या पार्श्वभूमीवर यापुढे सरसकट प्रत्येक निविदेमध्ये जेव्हीची अट रद्द करून ती फक्त विशेष कामांसाठीच वापरावी, असे निर्देश त्यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना दिले. शहरात अनेक ठिकाणी छोटीमोठी कामेही आपल्या मर्जीतील ठेकेदाराला मिळावीत, म्हणून हा जेव्हीचा राजकीय फंडा मागील काही वर्षांपासून महापालिकेत सुरू होता. मात्र, आता त्याला सुरुंग लावण्याचे काम महापालिका आयुक्तांनीच केल्याने जेव्हीच्या माध्यमातून आपली राजकीय पोळी भाजून स्वत:चे चांगभलं करून पाहणाºया लोकप्रतिनिधींना त्यांनी वेसण घातल्याचे बोलले जात आहे. यावेळी त्यांनी महापालिकेच्या वसुलीचाही आढावा घेऊन प्रत्येक विभागप्रमुखांनी उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही केल्या.