लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीची धमकी देत खंडणीची मागणी करणाऱ्या महिलेस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 08:38 PM2021-01-11T20:38:54+5:302021-01-11T20:41:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : आपल्याच एकेकाळच्या वकील मित्राविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्याच्याकडून ५० हजारांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: आपल्याच एकेकाळच्या वकील मित्राविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्याच्याकडून ५० हजारांची खंडणी उकळणाºया महिलेला ठाणेनगर पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने या महिलेचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.
ठाण्यातील एका वकीलाबरोबर सिंधुदुर्ग येथील एका महिलेची मैत्री झाली होती. याच मैत्रितून तिने चार लाखांच्या खर्चातून त्याला ठाण्यात पार्लर टाकून देण्यास सांगितले. हे पार्लर टाकल्यानंतर कालांतराने तिने या पार्लरच्या सामानाची विल्हेवाट लावून मुंब्रा येथील जेन्टस पार्लरमध्ये कामाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्यात भांडणे झाल्यानंतर तिने या वकिलाकडे दोन लाखांच्या खंडणीची मागणी करीत लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. नंतर तिने त्याच्याकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली. या त्रासाला कंटाळून त्याने तिला ५० हजार रुपये दिले. तरीही हा त्रास देणे तिने सुरुच ठेवले. हा प्रकार २७ जून २०१५ ते २१ मार्च २०१६ या काळात घडला. या प्रकरणी या वकीलाने या महिलेसह तिघांविरुद्ध १८ फेब्रुवारी २०२० रोजी फसवणूक, खंडणी मागणे आदी कलमांखाली तक्रार दाखल केली. याप्रकरणात ठाणे न्यायालयाने या महिलेचा ५ जानेवारी २०२० रोजी अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला. त्यानंतर ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांच्या पथकाने या महिलेला ९ जानेवारी २०२१ रोजी अटक केली.
* दरम्यान, यातील तक्रारदार असलेल्या वकीलाविरुद्ध या महिलेने जून २०१५ मध्ये लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. यात त्याला अटकही झाली होती. तेंव्हाही तक्रार दाखल करण्यापूर्वी आणि आरोपपत्र दाखल करण्यापूर्वीही तिने आपल्याकडे पैशांची मागणी केली होती, असेही या वकीलाने पोलिसांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.