धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या महिलेस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 12:59 AM2021-01-12T00:59:04+5:302021-01-12T00:59:14+5:30

न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामीन : ठाणेनगर पोलिसांची कारवाई

Woman arrested for threatening ransom | धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या महिलेस अटक

धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या महिलेस अटक

googlenewsNext

ठाणे : आपल्याच एकेकाळच्या वकील मित्राविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून ५० हजारांची खंडणी उकळणाऱ्या महिलेला ठाणेनगर पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.

ठाण्यातील एका वकिलाबरोबर सिंधुदूर्ग येथील एका महिलेची मैत्री झाली होती. याच मैत्रीतून तिने चार लाखांच्या खर्चातून त्याला ठाण्यात पार्लर टाकून देण्यास सांगितले. ते टाकल्यानंतर कालांतराने तिने या पार्लरच्या सामानाची विल्हेवाट लावून मुंब्रा येथील जेन्ट‌्स पार्लरमध्ये कामाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्यात भांडणे झाल्यानंतर तिने या वकिलाकडे दोन लाखांच्या खंडणीची मागणी करून लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. नंतर तिने त्याच्याकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली. या त्रासाला कंटाळून त्याने तिला ५० हजार रुपये दिले. तरीही हा त्रास देणे तिने सुरूच ठेवले. हा प्रकार २७ जून २०१५ ते २१ मार्च २०१६ या काळात घडला. या प्रकरणी या वकिलाने या महिलेसह तिघांविरुद्ध १८ फेब्रुवारी २०२० रोजी फसवणूक, खंडणी मागणे आदी कलमांखाली तक्रार दाखल केली. या प्रकरणात ठाणे न्यायालयाने या महिलेचा ५ जानेवारी २०२० रोजी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांच्या पथकाने या महिलेला ९ जानेवारी २०२१ रोजी अटक केली.

यातील तक्रारदार असलेल्या वकिलाविरुद्ध या महिलेने जून २०१५ मध्ये लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. यात त्याला अटकही झाली होती. तेव्हाही तक्रार दाखल करण्यापूर्वी आणि आरोपपत्र दाखल करण्यापूर्वीही तिने आपल्याकडे पैशांची मागणी केली होती, असेही या वकिलाने पोलिसांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 

Web Title: Woman arrested for threatening ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे