दुभाजकाला रिक्षा धडकून महिलेचा जळून मृत्यू, अपघातानंतर लागली आग; रिक्षाचालक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 08:04 AM2023-05-04T08:04:21+5:302023-05-04T08:05:10+5:30
रिक्षाचालक यादव हा लोकमान्यनगर पाडा क्रमांक चार येथील रहिवासी असून तो गायमुखवरून घोडबंदर रोडने ठाण्याकडे महिला प्रवासी घेऊन येत होता.
ठाणे - रिक्षावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातानंतर रिक्षाने अचानक पेट घेतला. त्या रिक्षामध्ये अडकलेल्या महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून, रिक्षाचालक राजेश कुमार यादव (४५) हे गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना बुधवारी पहाटे ५:४० वाजेच्या सुमारास घोडबंदर रोडवरील गायमुख पोलिस चौकीजवळ घडली. मृत पावलेल्या महिलेची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले.
रिक्षाचालक यादव हा लोकमान्यनगर पाडा क्रमांक चार येथील रहिवासी असून तो गायमुखवरून घोडबंदर रोडने ठाण्याकडे महिला प्रवासी घेऊन येत होता. यादव याचा रिक्षावरील ताबा सुटला. त्यामुळे रिक्षा रस्त्यामधील दुभाजकावर आदळली. त्यानंतर रिक्षाला अचानक आग लागली. रिक्षातील महिला प्रवासी रिक्षामध्ये अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यादव गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी कासारवडवली पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग विझविली.
आगीचा भडका उडाला कसा?
मृत अनोळखी महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू असून ती ठाण्यात बंगळुरू येथून आलेल्या रेल्वेतून उतरल्याचे सीसीटीव्हीतील फुटेजद्वारे उघड झाल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले. आग नेमकी कशामुळे लागली आणि आगीचा इतका भडका कसा उडाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.