महिला बालकल्याण समितीचा परदेशवारीचा घाट, नेपाळ दौऱ्यासाठी प्रशासनाने काढली निविदा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 12:12 AM2019-11-30T00:12:37+5:302019-11-30T00:13:01+5:30

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीची मुदत सप्टेंबरमध्ये संपलेली असतानाही अभ्यासाच्या नावाखाली चक्क परदेशवारीचा घाट घालण्यात आला आहे.

Woman Child Welfare Committee draws tender for foreign tour of Nepal | महिला बालकल्याण समितीचा परदेशवारीचा घाट, नेपाळ दौऱ्यासाठी प्रशासनाने काढली निविदा

महिला बालकल्याण समितीचा परदेशवारीचा घाट, नेपाळ दौऱ्यासाठी प्रशासनाने काढली निविदा

Next

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीची मुदत सप्टेंबरमध्ये संपलेली असतानाही अभ्यासाच्या नावाखाली चक्क परदेशवारीचा घाट घालण्यात आला आहे. परदेशात दौरे काढले जात नसतानाही पालिकेने नेपाळमधील पर्यटनस्थळी नगरसेविकांच्या दौºयासाठी निविदा मागवल्या असून कार्यादेश देणे बाकी असल्याचा प्रकार उघड झाला आहे.

नगरसेवकांच्या या पर्यटन सहलींवरून नेहमीच टीकेची झोड उठली आहे. नागरिकांमध्ये सातत्याने संताप व्यक्त होत आहे. तसे असताना नगरसेवक, अधिकाऱ्यांची करदात्या नागरिकांच्या पैशांमधून पर्यटन सहलींवर मौजमजा करण्याचा हव्यास मात्र अजूनही थांबलेला नाही. आतापर्यंत काही कोटी रुपयांची उधळपट्टी या पर्यटन सहलींवर केली गेली असून यातून शहराच्या हिताचे मात्र काहीच साध्य झालेले नाही. दौºयांचा प्रत्येक दिवसानुसार अहवालही आजपर्यंत सादर झालेला नाही.

महिला बालकल्याण समितीमध्ये १५ सदस्या असून या समितीची मुदत सप्टेंबरअखेरीस संपलेली आहे. समितीच्या सभापतीपदी भाजपच्या दीपिका अरोरा तर उपसभापती भाजपच्या वंदना भावसार या होत्या. समितीच्या कार्यकाळात २० जुलै रोजी अभ्यासदौरा काढण्याचा ठराव भाजप, शिवसेना व काँग्रेसच्या नगरसेविकांनी एकमताने मंजूर केला होता. त्यासाठी १५ लाखांची तरतूद आहे. इतर शहरांत जाऊन नवीन योजनांचा अभ्यास करणे आवश्यक आहे, असे ठरावात नमूद केले होते.

समितीच्या ठरावानंतर प्रशासनाने प्रस्ताव तयार केला आणि आयुक्त बालाजी खतगावकर यांनीही त्यास मंजुरी दिली. गंभीर बाब म्हणजे प्रशासनाच्या प्रस्तावात दौरा कुठे काढायचा, याची माहितीच नमूद नव्हती. तसे असताना पालिकेने चक्क समितीच्या नेपाळ दौºयासाठी निविदा मागवल्या. २ नोव्हेंबर रोजी निविदा प्रसिद्ध केली होती. निविदा स्वीकारण्याची अंतिम मुदत १८ नोव्हेंबर होती. महिला-बालकल्याण समितीच्या नगरसेविकांसाठी नेपाळ दौºयाच्या आयोजनाबाबत पालिकेस तीन निविदा प्राप्त झालेल्या आहेत. तीन कंत्राटदारांनी निविदा भरल्या असून त्या उघडण्यात आल्या का? याची माहिती देण्यास प्रशासन टाळटाळ करत आहे.

सरकारच्या आदेशानुसार महिला व बालकांच्या योजनांच्या अभ्यासासाठी प्रशिक्षण सहल चांगल्या योजना राबवण्यात येत आहेत. त्या क्षेत्रास भेट द्यावी असे आहे. सरकारी योजना व कार्यालयीन कामकाजाबाबत प्रशिक्षण द्यावे व त्यासाठी प्रतिलाभार्थी दरमहा जास्तीतजास्त दोन हजार खर्च करावेत, असेही आदेशात स्पष्ट नमूद आहे. परंतु, समितीने मात्र चक्क परदेशात नेपाळ येथे अभ्यासाच्या नावाखाली पर्यटन सहलीचे आयोजन करत निविदा मागवल्याचे उघड झाले आहे.

समितीची मुदत संपलेली आहे. पण, नेपाळ येथे अभ्यासदौरा काढण्याची निविदा प्रशासनाने काढलेली आहे. प्रशिक्षण दौºयाची तरतूदच पालिकेने करू नये. नेपाळ दौरा रद्द करण्यासाठी पत्र देणार आहे.
- दीपिका अरोरा, माजी सभापती

परदेशात दौरा काढताच येत नाही. याबाबतची माहिती आपण मागवत आहोत. महिला बालकल्याण समितीची मुदत संपलेली असल्याने हा दौराच रद्द केला जाईल.
- बालाजी खतगावकर, आयुक्त

नगरसेवक आणि अधिकाºयांची नागरिकांच्या पैशांवर मजा मारण्याची खोड काही जात नाही. नागरिकांवर कर लादता आणि स्वत: मात्र मजा मारता. पालिकेने नेपाळ दौºयाची निविदा काढलीच कशी? महिला-बालकल्याण समितीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे असून सखोल चौकशी करून नगरसेविका आणि अधिकाºयांवर कारवाई करा.
- हेमंत सावंत, शहर संघटक, मनसे

Web Title: Woman Child Welfare Committee draws tender for foreign tour of Nepal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.