चोरांशी झालेल्या झटापटीत रिक्षातील महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 07:23 AM2021-06-11T07:23:24+5:302021-06-11T07:23:52+5:30
Thane : चोरट्यांकडून तिचा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न सुरू असतानाच रिक्षातून खाली पडून ती गंभीर जखमी झाली. त्यातच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी गुरुवारी दोघांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे : मोबाइल चोरट्यांशी प्रतिकार करताना कळवा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून पडून ३१ वर्षीय प्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता रिक्षा प्रवासादरम्यान ठाण्यातील कन्मिला रायसींग (२७) या महिलेलाही अशाच प्रकारे बुधवारी रात्री जीव गमवावा लागला आहे. चोरट्यांकडून तिचा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न सुरू असतानाच रिक्षातून खाली पडून ती गंभीर जखमी झाली. त्यातच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी गुरुवारी दोघांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबईत राहणारी लालचुरसांगी फॅन्चुन (३०, रा. कलिना, सांताक्रुझ) ही तिची मैत्रीण कन्मिला हिच्यासह ठाण्यातील विवियाना मॉल येथून ९ जून रोजी रात्री ७.५० वाजण्याच्या सुमारास नाशिक-मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावरील तीनहातनाका येथील ओपन जीमजवळील रस्त्याने मुंबईकडे रिक्षातून जात होती. त्याचवेळी एका मोटारसायकलवरून
दोघे जण त्यांचा पाठलाग करीत आले. त्या दोघांनीही रेनकोट घातलेला होता. त्याचवेळी पाठीमागे बसलेल्याने कन्मिला
हिच्या हातातील मोबाइल जबरीने हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला. हा हिसका इतका जोरदार होता की, हा मोबाइल त्याच्याकडून हिसकावण्याचा प्रयत्न सुरू असताना ती तोल जाऊन खाली कोसळली. यात डोक्याला मार लागून ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल केले.
मात्र, तासाभरानेच तिचा मृत्यू ओढवला. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोहर सोनवणे आणि उपनिरीक्षक विनोद लभडे यांच्या पथकाने भिवंडीतून गुरुवारी अल्केश परवेझ मोमीन अन्सारी (२०) आणि सोहेल अन्सारी (१८, रा. दोघेही भिवंडी) या दोघांना तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या आधारे अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.