मोबाइल चोराशी झटापटीत महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:30 AM2021-06-01T04:30:43+5:302021-06-01T04:30:43+5:30

ठाणे: चालत्या रेल्वेमधून मोबाइल खेचून पलायन करणाऱ्या चोरट्याला रोखण्याचा प्रयत्न करताना विद्या ज्ञानेश्वर पाटील (३५) या महिलेचा शनिवारी कळवा ...

Woman dies in fight with mobile thief | मोबाइल चोराशी झटापटीत महिलेचा मृत्यू

मोबाइल चोराशी झटापटीत महिलेचा मृत्यू

Next

ठाणे: चालत्या रेल्वेमधून मोबाइल खेचून पलायन करणाऱ्या चोरट्याला रोखण्याचा प्रयत्न करताना विद्या ज्ञानेश्वर पाटील (३५) या महिलेचा शनिवारी कळवा स्थानकाजवळ मृत्यू झाला. मोबाइल चोर फैजल शेख (३१, रा. मुंब्रा) याला ठाणे रेल्वे पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली असून, त्याला ४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कल्याण रेल्वे न्यायालयाने दिले.

डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या विद्या या २९ मे रोजी अंधेरी येथून उपनगरी रेल्वेने घरी परत येत होत्या. लोकल सायंकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास कळवा स्थानक सोडत असतानाच आधीच दबा धरून बसलेला फैजल डब्यात शिरला व त्याने विद्या यांच्या हातामधील मोबाइल हिसकावला. त्याला रोखण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन त्या खाली पडल्या. परंतु, तोपर्यंत गाडीने फलाट सोडला असल्याने व वेग घेतला असल्यामुळे त्या रेल्वेखाली आल्या. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचे रेल्वे पोलिसांना वाटले. परंतु, याच डब्यातील एका अन्य महिला प्रवाशाने दिलेल्या माहितीच्या आधारे हा जबरी चोरीचा प्रकार असल्याचे उघड झाले. ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार खडकीकर, पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप बागुल, सहायक पोलीस निरीक्षक हरिदास डोळे आणि दिनेश कुलकर्णी आदींच्या पथकाने फैजल या सराईत गुन्हेगाराला मुंब्य्रातून अटक केली. त्याच्यावर यापूर्वी २१ गुन्ह्यांची नोंद आहे.

* पाच दिवसांपूर्वीच सुटला जामिनावर-

सराईत गुन्हेगार असलेला फैजल हा २५ मे रोजी न्यायालयातून १५ हजारांच्या जामिनावर सुटला होता. त्याला तीन महिन्यांपूर्वी ठाणे रेल्वे पोलिसांनी अशाच एका जबरी चोरीमध्ये अटक केली होती.

* तीन मुली झाल्या आईला पोरक्या-

एका खासगी आयात-निर्यात कंपनीमध्ये विद्या पाटील या नोकरीला होत्या. त्या दररोज डोंबिवली ते अंधेरी रेल्वेने प्रवास करीत होत्या. त्यांना सहा, चार वर्षांच्या आणि एक तीन महिन्यांची अशा तीन मुली आहेत. केवळ एका मोबाइल चोरट्यामुळे या मुलींना आपल्या आईला मुकावे लागल्याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

...........

Web Title: Woman dies in fight with mobile thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.