एक्स्प्रेस गाडीच्या शौचालयात महिलेने दिला बाळाला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 02:01 AM2020-11-04T02:01:05+5:302020-11-04T02:01:29+5:30
express train : उत्तर प्रदेश राज्यातील मारियाहू गावातील राजेश विश्वकर्मा (३३) हा आपल्या पत्नीसह नालासोपारा येथे मागील काही वर्षांपासून राहत होता. त्याची पत्नी गर्भवती असल्याने तिची प्रसुती डिसेंबर महिन्यात होईल, असे त्याच्या खासगी डॉक्टरांनी सांगितले होते.
पालघर : मुंबईमधून उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या वांद्रे-गाझीपूर कोविड स्पेशल एक्स्प्रेस गाडीच्या शौचालयात गुडिया विश्वकर्मा (२७) या महिलेने रविवारी रात्री १२ वाजता बाळाला जन्म दिल्याची घटना घडली. दोघेही बाळ-बाळंतीण सुखरूप असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
उत्तर प्रदेश राज्यातील मारियाहू गावातील राजेश विश्वकर्मा (३३) हा आपल्या पत्नीसह नालासोपारा येथे मागील काही वर्षांपासून राहत होता. त्याची पत्नी गर्भवती असल्याने तिची प्रसुती डिसेंबर महिन्यात होईल, असे त्याच्या खासगी डॉक्टरांनी सांगितले होते. तिची काळजी घेण्यासाठी बाळंतपणासाठी तिला आपल्या गावी आई-वडिलांकडे सोडायला दोघांनीही रविवारी मुंबईहून वांद्रे-गाझीपूर एक्स्प्रेस पकडली. या एक्स्प्रेसने विरार स्थानक सोडल्यानंतर गुडियाला प्रसुती वेदना होऊ लागल्या. वेदना वाढू लागल्याने तिने शौचालय गाठले आणि मोठा धीर एकवटून स्वतःच्या प्रयत्नाने बाळाला सुखरूप जन्म दिला.
या घटनेची माहिती तिकीट तपासनीसाला देण्यात आल्यानंतर त्यांनी पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठांशी संपर्क साधून ट्रेन पालघर येथे थांबविण्याची परवानगी मिळविली. पालघर रेल्वे स्थानकात रात्री १२ वाजता ट्रेन थांबविण्यात आल्यानंतर त्या महिलेला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. डॉ. राजेंद्र चव्हाण यांनी त्या महिला आणि बाळाची तपासणी करून त्यांना घरी सोडले. या महिलेच्या प्रसुतीनंतर झालेला खर्च पश्चिम रेल्वे प्रशासनाने डॉ. चव्हाण यांना देण्याचे कबूल केले, मात्र डॉक्टरांनी ते बिल नाकारले.